गारगोटीला मेडिकल हब बनविणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। भुदरगड तालुक्यासह इतर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य सेवेला अधिक बळ देण्यासाठी गारगोटीला मेडिकल हब बनवणार असे, प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालयात नव्याने सुरू करण्या
गारगोटी  उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत वैद्यकीय उपकरणे


कोल्हापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। भुदरगड तालुक्यासह इतर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य सेवेला अधिक बळ देण्यासाठी गारगोटीला मेडिकल हब बनवणार असे, प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या अत्यंत अद्ययावत वैद्यकीय उपकरणांचा लोकार्पण समारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती सारिका नांदेकर, गारगोटी पंचायत समिती सभापती विक्रमसिंह पाटील, उपसभापती अरुणा देसाई, आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सरिता थोरात, गारगोटीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर व गट विकास अधिकारी शेखर जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री आबिटकर म्हणाले, हृदयविकाराचा झटका, अपघात यासारख्या प्रसंगी, किंवा सिटी स्कॅन करिता कोल्हापूर शिवाय पर्याय नव्हता. पण या उपजिल्हा रुग्णालयात बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक उपकरणांमुळे तालुक्यातील व आसपासच्या परिसरातील रुग्णांना आता अत्याधुनिक वैद्यकीय तपासण्यांसाठी दूरवर जाण्याची गरज राहणार नाही. या सर्व सेवा या रुग्णालयातच तात्काळ उपलब्ध होणार आहेत. याठिकाणी सी.टी. स्कॅन मशीन आपत्कालीन व गंभीर आजारांच्या अचूक निदानासाठी, 2 डी इको मशीन हृदयविकार व हृदयाशी संबंधित आजारांच्या तपासणीसाठी तर 300 MA एक्स-रे मशीन डिजिटल आणि अधिक स्पष्ट क्ष-किरण तपासणीसाठी तसेच ट्रू-नॉट मशीन जलद वैद्यकीय चाचण्या व निदानासाठी अशी आधुनिक यंत्रसामग्री कार्यान्वित करण्यात आली आहे. या अद्ययावत वैद्यकीय सुविधांमुळे भुदरगड तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे प्रत्येक रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार आहे.

ते म्हणाले, गारगोटी येथील उप जिल्हा रुग्णालयातील जुन्या इमारतीत 15 ऑगस्टनंतर आधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध होणार आहे. यापुढे सांगली, मिरज, कोल्हापूरला जाण्याची आवश्यकता राहणार नाही. त्याचबरोबर या राज्यातील प्रत्येक रुग्णालयात कॅन्सर रुग्णांच्या निदानसाठी पेट स्कॅन मशीन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गारगोटी येथील रुग्णालय 50 बेडचे आता 100 बेडमध्ये श्रेणीवर्धन करण्यासाह राधानगरी, सोळांकुर व तारळे येथील रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गारगोटी येथील रुग्णालयात कॅथलॅबची सुविधाही उपलब्ध होणार आहे. नुकताच पुणे जिल्ह्यातील 45 प्राथमिक आरोग्य केंद्राचे उदघाटन झाले. या प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्या सुविधा दिल्या आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कडगाव येथे सुविधा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande