
रायगड, 03 ऑगस्ट (हिं.स.)। : हिंदवी स्वराज्याचे अजिंक्य सेनानी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त अमृत महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित विभागस्तरीय अमृत पराक्रम दिन निबंध, वक्तृत्व आणि रील (Reel) स्पर्धांचे उद्घाटन मुख्यालयात उत्साहात झाले. इतिहास फक्त वाचायचा नसतो, तो जगायचाही असतो, या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून युवकांमध्ये इतिहासाविषयी अभिमान आणि राष्ट्रनिष्ठा जागविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदराव कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभली, तर ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.
पांडुरंग बलकवडे यांनी बाजीराव पेशवे यांच्या अद्वितीय युद्धनीती, नेतृत्वगुण आणि मराठा साम्राज्याच्या विस्तारातील योगदानावर प्रकाश टाकला. इतिहासाचा अभ्यास केवळ परीक्षांपुरता न राहता राष्ट्रप्रेम, धैर्य, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करणारा ठरावा, यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. डिजिटल युगातील युवकांना आकर्षित करण्यासाठी रील स्पर्धेचाही समावेश करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
नरेंद्र पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि थोरले बाजीराव पेशवे यांनी सर्व समाजासाठी कार्य केल्याचे सांगत सामाजिक समरसतेची गरज अधोरेखित केली. अमृत संस्थेचे विविध सामाजिक व उद्योजकता विकास उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. गोविंदराव कुलकर्णी यांनीही अमृतच्या सर्वसमावेशक कार्याची प्रशंसा केली.
अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी संस्थेचा प्रवास, विविध उपक्रम आणि स्पर्धेमागील उद्दिष्टे स्पष्ट केली. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या विशेष स्मृतिचिन्हांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राज्यभरातील विद्यार्थी, इतिहासप्रेमी आणि युवकांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन अमृत संस्थेने केले आहे. पराक्रम दिन वेबसाईट लिंक-https://parakramdin.mahaamrut.org.in,
अमृत अधिकृत संकेत स्थळ - www.maharashtra.org.in
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)