
छत्रपती संभाजीनगर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। पी. एस. महाविद्यालयात झालेल्या मॅरेथॉननंतर एक अतिशय प्रेरणादायी प्रसंग पाहायला मिळाला. मॅरेथॉन संपल्यानंतर अनेकजण फोटो काढण्यात व्यस्त असताना, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत (भा.प्र.से.) यांची नजर मैदानाच्या एका कोपऱ्यात शांतपणे कचरा व प्लास्टिक गोळा करणाऱ्या स्वच्छता सेविका ताईंवर पडली.कोणताही मोठेपणा न मिरवता विभागीय आयुक्त थेट त्यांच्याजवळ गेले. त्यांनी त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले, आस्थेने विचारपूस केली आणि कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्यासोबत छायाचित्रही काढले.या छोट्याशा कृतीतून त्यांनी ‘पदापेक्षा माणुसकी मोठी’ आणि ‘श्रमाचा सन्मान हीच खरी श्रमप्रतिष्ठा’ हा मोठा संदेश दिला.
घंटागाडीवरील कर्मचारी असोत, सफाई कामगार असोत किंवा सार्वजनिक ठिकाणी सेवा देणारे कर्मचारी असोत; त्यांच्या कामाचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. खरा स्वच्छ भारत केवळ हातात झाडू घेऊन नाही, तर प्रत्येक श्रमिकाचा आणि त्यांच्या श्रमाचा आदर केल्यावरच साकार होईल. स्वच्छ भारत अभियान हे केवळ शासनाचे काम नसून ती आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. या अभियानाचे खरे आधारस्तंभ म्हणजे आपले स्वच्छता कर्मचारी. त्यांच्या अहोरात्र परिश्रमामुळे आपला परिसर, आपले शहर आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ राहतात.
------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis