रत्नागिरी : कोकणातील पहिल्या श्री विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठाचे मंगळवारी उद्घाटन
रत्नागिरी, 3 ऑगस्ट (हिं.स.) । कोकणातील उच्च शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या श्री विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठाचे (विशिष्ट श्रेणी) उद्घाटन मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) सकाळी १० वाजता सावर्डे येथील एस.व्ही.जे.सी.टी. संकुलात होणार आहे. ज्येष्ठ अ
विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठ


रत्नागिरी, 3 ऑगस्ट (हिं.स.) । कोकणातील उच्च शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या श्री विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठाचे (विशिष्ट श्रेणी) उद्घाटन मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) सकाळी १० वाजता सावर्डे येथील एस.व्ही.जे.सी.टी. संकुलात होणार आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते विद्यापीठाचे उद्घाटन होणार आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० (NEP 2020) अनुरूप बहुविषयक, कौशल्याधारित आणि संशोधनाभिमुख शिक्षण देण्यावर विद्यापीठाचा भर राहणार आहे. आधुनिक शिक्षणासोबत भारतीय ज्ञानपरंपरा, संशोधन, नवोपक्रम आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याची माहिती प्रमुख विश्वस्त विकास वालावलकर यांनी दिली.

विद्यापीठात बी.एस्सी. स्पेस सायन्स, बी.एस्सी. नॅचरल फार्मिंग विथ ए.आय., बी.एस्सी. सायकोलॉजिकल अँड स्पिरिच्युअल हेल्थ, बी.एस्सी. बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन विथ ए.आय., बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स, एम.एस्सी. क्लिनिकल अँड काउन्सेलिंग सायकॉलॉजी, बी.ए. व एम.ए. दर्शनशास्त्र (IKS आणि संस्कृत) तसेच एम.एस्सी. ॲडव्हान्स बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन यांसारखे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम प्रस्तावित करण्यात आले आहेत. तसेच मल्टिपल एंट्री-एक्झिट प्रणालीद्वारे प्रमाणपत्र, डिप्लोमा, पदवी आणि ऑनर्स/संशोधन पदवीचे पर्याय उपलब्ध असतील.

उद्घाटन सोहळ्यात विद्यापीठ गीताचे प्रकाशन, शैक्षणिक वाटचालीवर आधारित विशेष कार्यक्रम तसेच मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. भूषण पटवर्धन, महाराष्ट्र राज्य (NEP-2020) सुकाणू समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन करमळकर, माजी कृषिमंत्री शशिकांत सुतार आणि टाटा मेमोरिअल सेंटरचे माजी शिक्षण संचालक डॉ. श्रीपाद बाणावली यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कोकणातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणे, संशोधन व कौशल्य विकासाला चालना देणे आणि उद्योगाभिमुख शिक्षणाची नवी दिशा निर्माण करणे, या उद्देशाने विद्यापीठ कार्यरत राहणार असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी, पालक, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande