रत्नागिरी : गांधी-नेहरू-आंबेडकरांशिवाय भारताची कल्पनाच अपूर्ण : संजय आवटे
रत्नागिरी, 3 ऑगस्ट (हिं.स.) । महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाशिवाय आधुनिक भारताची कल्पनाच पूर्ण होऊ शकत नाही. या तिन्ही महापुरुषांचे देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असून त्यांच्या अनुयायांनी परस्परविरोध
रत्नागिरी : गांधी-नेहरू-आंबेडकरांशिवाय भारताची कल्पनाच अपूर्ण : संजय आवटे


रत्नागिरी, 3 ऑगस्ट (हिं.स.) । महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाशिवाय आधुनिक भारताची कल्पनाच पूर्ण होऊ शकत नाही. या तिन्ही महापुरुषांचे देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असून त्यांच्या अनुयायांनी परस्परविरोध निर्माण करण्याऐवजी त्यांच्या विचारांतील समान धागा समजून घ्यावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व लेखक संजय आवटे यांनी केले.

निर्भय बनो भारत जोडो अभियानांतर्गत २६ सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित सामाजिक एकता परिषदेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी राजन इंदुलकर होते. चिपळूणमधील सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक एकोपा कायम राखण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.आवटे म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान नसते तर भारताचा विकास इतक्या व्यापक पातळीवर झाला नसता. भारत हा विविधतेत एकता जपणारा संघराज्यात्मक देश असून सध्या समाजात जातीय ध्रुवीकरणाचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळी सामाजिक ऐक्य टिकविण्यासाठी समाजाने अधिक सजग राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.देशातील संत, समाजसुधारक आणि पुरोगामी विचारवंतांनी भारताला एकत्र बांधून ठेवण्याचे कार्य केले असून चिपळूणसारख्या शहरात विविध सामाजिक संघटना सामाजिक सलोख्यासाठी एकत्र येत असल्याचे त्यांनी कौतुकाने नमूद केले.

तरुणाईच्या भूमिकेचा गौरव करताना आवटे म्हणाले, आजची तरुण पिढी वैचारिकदृष्ट्या अधिक जागरूक आहे. पूर्वी चटणी-भाकरीवर चळवळी उभ्या राहत होत्या, तर आज पिझ्झा-बर्गर खाणारी तरुणाईही समाजपरिवर्तनासाठी रस्त्यावर उतरते, ही सकारात्मक बाब आहे. जंतरमंतरसारख्या आंदोलनांत मुला-मुलींचा सुरक्षित आणि समान सहभाग ही नव्या पिढीची मोठी जमेची बाजू असल्याचे त्यांनी सांगितले.शिक्षणाच्या वाढत्या खासगीकरणावर टीका करताना त्यांनी सरकारी शिक्षण व्यवस्थेला बळकटी देण्याची गरज व्यक्त केली. सरकारी शिक्षण कमकुवत होत असून खासगी शिक्षणाचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींनाच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

पालकांनी मुलांना जाती-धर्माच्या चौकटीत न अडकवता चांगले संस्कार देऊन प्रथम माणूस म्हणून घडवावे, असे आवाहन त्यांनी केले. देशातील सामाजिक सलोखा, लोकशाही मूल्ये आणि संविधानिक विचार अधिक दृढ करण्यासाठी अशा सामाजिक एकता परिषदांची आवश्यकता असल्याचेही आवटे यांनी नमूद केले.या परिषदेचे आयोजन संविधान सन्मान समितीसह २६ सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीद खेरटकर यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande