
- भाविकांना गुरुवारी करणार लाडवाचे वितरण
अमरावती, 03 ऑगस्ट (हिं.स.)।
संत श्री गजानन महाराजांच्या अमरावती शहरासह जिल्ह्यातील भाविकांनी समर्पण भावनेतून स्व-ईच्छेने एकत्रित केलेली बुंदीचे लाडू प्रसाद सामुग्री श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांव येथे सर्व आयोजकांनी समर्पित केली. या सामुग्रीची किंमत ६ लाख ७० हजार ६६७ रु. असून संस्थानाद्वारे आयोजकांना रितसर पावतीही देण्यात आली आहे.
लाडू प्रसाद उत्सव समितीद्वारे ५ ते २८ जुलैपर्यंत राबवण्यात आलेल्या सेवा अभियानाच्या माध्यमातून ही सामुग्री एकत्र करून ती महाराजांच्या चरणी समर्पित करताना आयोजकांना अत्यानंद झाला. गुरुवार ६ ऑगस्ट रोजी या सामुग्रीपासून बुंदीचे लाडू तयार करून ते शेगाव येथे महाप्रसाद घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून वितरित केले जाणार आहेत.
लाडू प्रसाद उत्सव समितीने यासाठी जिल्ह्यासह विदर्भातील विविध शहरांमध्ये संग्रह केंद्र तयार केले होते. तसेच ऑनलाईन समर्पणाची सुविधाही देण्यात आली होती. कोणी रुपयांद्वारे, कोणी साखर, कोणी चना डाळ, कोणी सुक्या मेव्याद्वारे आपली सेवा रूजू केली. शेगाव संस्थान दररोज दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महाप्रसादात बुंदीचे लाडू वितरित करीत असते. यासाठी मोठ्या प्रमाणात शुद्ध तूप, साखर, हरभऱ्याचे पीठ, सुका मेवा लागतो. या महायज्ञात आपलेही योगदान असावे, या भावनेतून साहित्य संग्रहित करण्यात आले. गेल्या वर्षीही २ लाख २१ हजार रुपयांचे साहित्य संत श्री गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करण्यात आले होते. हे सेवादानाचे कार्य असल्यामुळे लाडू प्रसाद उत्सव समितीने पूर्ण काम श्रद्धेने केले. जिल्ह्यात अमरावती, बडनेरा, अचलपूरसह विविध मुख्य शहरांमध्ये संग्रह केंद्र तयार करण्यात आले होते. या सत्कार्यासाठी भाविकांनी आपापल्या क्षमतेनुसार सहकार्य केले.
सुका मेवा १०३ किलो
हरभरा डाळ ५२
क्विंटल एकूण ११९.३ किलो
साखर ६६ क्विंटल
-----------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी