
- वृक्षलागवाडीबाबत लेखी हमीची मागणी
वर्धा, 03 ऑगस्ट (हिं.स.)।
हिंगणघाट–जाम राष्ट्रीय महामार्गावरील ग्रीन कॉरिडॉरमध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडीची पर्यावरण संवर्धन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. सेवा रस्त्याच्या कामासाठी सुमारे ५०० झाडे तोडण्यात येत असून त्यासाठी वन विभागाची मंजुरी असल्याची माहिती संबंधित अभियंत्यांनी दिली. मात्र, मंजुरीमध्ये तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या बदल्यात किती, कुठे व केव्हा वृक्षलागवड केली जाणार याचा कुठेच उल्लेख नसल्याने संस्थेने आक्षेप नोंदविला. यानंतर वर्धा वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी ही त्रुटी मान्य करत संबंधित कंत्राटदाराला तातडीने लेखी सूचना देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, कंत्राटदार महल्ले यांनी सोमवारीच अधिकाधिक वृक्षलागवडीबाबतचे लेखी नियोजन सादर करण्याचे मान्य केले. संबंधित अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी सेवा रस्त्याचे काम सुरू आहे तो भाग अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) असल्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी तेथे सेवा रस्ता बांधकाम आवश्यक आहे. मात्र, विकासकामांसाठी वृक्षतोडीची परवानगी देताना त्या बदल्यातील अनिवार्य वृक्षलागवडीचा स्पष्ट उल्लेख न करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखला गेला नाही, तर त्याचे दुष्परिणामही अखेरीस मानवी जीवनावरच होणार आहेत, हे विसरून चालणार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी