
अमरावती, 3 ऑगस्ट (हिं.स.) : शेंदूरजनाघाट नगरपरिषद क्षेत्रातील ओला व सुका कचरा संकलन आणि त्याच्या मूल्यमापन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आघाडीने निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.
महाविकास आघाडीच्या निवेदनानुसार, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 2014 पासून शहरातील ओला व सुका कचरा घंटागाडी आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने संकलित केला जात आहे. मात्र, कचरा डेपोवर पोहोचल्यानंतर त्याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण व मूल्यमापन न करता चुकीची नोंद केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे शासनाची दिशाभूल होत असून अतिरिक्त आर्थिक लाभ घेतला जात असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी शहरातून दररोज आठ ते दहा टन कचरा संकलित होत असल्याची माहिती दिली आहे. मात्र, हा आकडा संशयास्पद असल्याचा आरोप करत प्रत्यक्षात इतक्या प्रमाणात घनकचरा संकलित होतो का, याची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीने संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर दंडात्मक कारवाई करावी तसेच अनियमिततेमुळे शहरातील नागरिकांवर पडणारा आर्थिक भार कमी करावा, अशी मागणी केली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या अनियमितता पुन्हा आढळल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आघाडीने दिला आहे.
निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय डफरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष पवन बेलसरे, अनिल आंडे, शिवसेनेचे कपिल तरार यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी