
पुणे, 03 ऑगस्ट (हिं.स.)।
खडकवासला धरणसाखळीसाठी यंदाचा जुलै महिना गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक दिलासादायक ठरला आहे. एक जुलै ते एक ऑगस्ट या कालावधीत धरणसाखळीतील चारही धरणांच्या पाणीसाठ्यात तब्बल २४.५४ टीएमसीची वाढ झाली असून, गेल्या वर्षी याच कालावधीत ही वाढ १०.६७ टीएमसी इतकी होती. त्यामुळे यंदाच्या जुलैमध्ये पावसाचे प्रमाण आणि धरणांतील जलसाठ्यात झालेली वाढ मागील पाच वर्षांतील सर्वोच्च ठरली आहे.
जून महिन्यात मान्सूनने अपेक्षित वेग पकडला नव्हता. मात्र, जुलैमध्ये दोन टप्प्यांत झालेल्या मुसळधार पावसाने परिस्थिती पूर्णपणे बदलली. गतवर्षी मे महिन्यातच मान्सून दाखल झाला असला तरी जुलैमध्ये त्याचा जोर कमी झाल्याने धरणांतील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नव्हती. यंदा मात्र दमदार पावसामुळे जलसाठ्यात विक्रमी वाढ नोंदविण्यात आली.
खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदाच्या जुलैमध्ये ५६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत हा पाऊस केवळ १३३ मिलिमीटर होता. या वाढीव पावसाचा थेट परिणाम धरणांतील पाणीसाठ्यावर झाला.
विशेष म्हणजे, पानशेत धरणात गेल्या पाच वर्षांत प्रथमच जुलै महिन्यात आठ टीएमसीहून अधिक पाणीसाठ्याची वाढ झाली आहे. वरसगाव धरणातही लक्षणीय जलसाठा वाढला आहे. टेमघर धरणात २०२४ मध्ये ३.३८ टीएमसी पाणीसाठा वाढला होता, तर यंदा ही वाढ ३.२६ टीएमसी इतकी झाली आहे.
जुलैमधील दमदार पावसामुळे खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचला असून, पुणे शहर आणि परिसराच्या आगामी पाणीपुरवठ्याबाबत मोठा दिलासा मिळाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु