
पुणे, 03 ऑगस्ट (हिं.स.)।
भोसरी येथील कौटुंबिक मालमत्तेच्या विकास व्यवहारात आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत विनोद अनंता धुमाळ यांनी बांधकाम व्यावसायिक कुणाल दिलीप चोरडिया यांच्याविरोधात तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पिंपरी येथील पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रकरणाची माहिती दिली.
धुमाळ यांनी सांगितले की, २२ डिसेंबर २००६ रोजी नोंदणीकृत विकसन करार आणि कुलमुखत्यार पत्रानुसार संबंधित मालमत्तेच्या विकासाच्या बदल्यात व्यावसायिक इमारतीतील एक दुकान आणि ६५० चौरस फूट सुपर बिल्ट-अप क्षेत्रफळाचा एक फ्लॅट चार वर्षांच्या कालावधीत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनावर विश्वास ठेवून कुटुंबाने मालमत्ता विकासासाठी दिली असल्याचा त्यांचा दावा आहे.
मात्र, करारानंतर जवळपास दोन दशके उलटूनही विकासकाम सुरू झाले नसून, करारातील अटींची पूर्तता करण्यात आलेली नाही, असा आरोप धुमाळ यांनी केला. याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
मोबदला अथवा मालमत्ता परत देण्याची मागणी केल्यानंतर संबंधितांकडून धमक्या देण्यात आल्या, शिवीगाळ करण्यात आली आणि गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे सांगण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, अद्याप संबंधितांविरोधात अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचा दावा धुमाळ यांनी केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु