
सोलापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय, सोलापूर आणि हृदय स्पर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठीतून तेलुगु लिहायला-वाचायला शिका या दहा आठवड्यांच्या मोफत अभ्यासक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. डिजिटल आणि प्रत्यक्ष स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी ७४ प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष देविदास गोटीपामूल होते. प्रमुख पाहुण्या म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर उपस्थित होत्या. मराठी भाषिकांसाठी मराठीतून तेलुगु भाषा शिकविण्याचा हा अभिनव उपक्रम असल्याचे सांगत त्यांनी आयोजकांचे कौतुक केले आणि भविष्यात आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
आधुनिक सारथी मासिकाचे संपादक श्रीनिवास बुरा यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचे तसेच तेलुगु प्रशिक्षण वर्गाचे कौतुक केले. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक प्रतिसाद मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तेलुगू–मराठी साहित्यिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा कवी नरेंद्र गुंडेली यांनी वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध भाषांतील सुमारे ३५ हजार पुस्तकांच्या संग्रहाचे कौतुक करत तेलुगु आणि मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले.
पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह अरविंद चीन्नी यांनी वाचनालयाच्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमास संचालक आनंद वल्लाकट्टी यांचीही प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनानंतर झालेल्या पहिल्या वर्गात प्रशिक्षक काशिनाथ गंजी यांनी तेलुगु भाषेतील १४ स्वर (अच्चुलु) प्रात्यक्षिकासह शिकविले. तसेच तेलुगुतील अभिवादन, परिचय करून देणारे शब्द आणि दैनंदिन वापरातील सोपी वाक्ये सहभागींसमोर सादर केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड