सोलापुरातील ‘एमडी’ ड्रग्ज पुरवठादार मुंबईतून जेरबंद
सोलापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)सोलापूर शहरातील तरुणांना ‘एमडी’ (मेफेड्रोन) ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या मेहमूद शेख (वय ५१) याला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतून ताब्यात घेऊन सोलापुरात आणले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही एमडी ड्रग्ज प्रकरणात त्याच्यावर कार
MD drug


सोलापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)सोलापूर शहरातील तरुणांना ‘एमडी’ (मेफेड्रोन) ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या मेहमूद शेख (वय ५१) याला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतून ताब्यात घेऊन सोलापुरात आणले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही एमडी ड्रग्ज प्रकरणात त्याच्यावर कारवाई झाली होती. आता फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या नव्या गुन्ह्यातही तोच मुख्य पुरवठादार असल्याचे तपासात समोर आले आहे. मंगळवारी (४ ऑगस्ट) त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुना पुणा नाका परिसरातून २९ जुलै रोजी शहर गुन्हे शाखेने रुपेश प्रदीप थडसरे (वय ३४, रा. मित्रनगर, शेळगी) याला अटक केली होती. त्याच्याकडून सुमारे ६.८० लाख रुपये किमतीचे ३४ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय माळी आणि पोलिस उपनिरीक्षक मनोज मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

चौकशीदरम्यान रेल्वेमार्गे एक व्यक्ती ड्रग्ज पुरवून गेल्याची माहिती आरोपीने दिल्यानंतर तपासाची सूत्रे मेहमूद शेखपर्यंत पोहोचली. त्यानंतर त्याला मुंबईतून ताब्यात घेऊन सोलापुरात आणण्यात आले. यापूर्वी २२ एप्रिल रोजी जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुफियान फुलारी आणि तौफिक सय्यद यांना ४६ ग्रॅम मेफेड्रोनसह अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणातही मेहमूद शेख हाच मुख्य पुरवठादार असल्याचे निष्पन्न झाले होते. आणि त्यावेळीही त्याला मुंबईतून अटक करण्यात आली होती. सलग दुसऱ्यांदा एमडी ड्रग्ज प्रकरणात त्याचे नाव समोर आल्याने सोलापुरातील अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा तपास अधिक गतीने सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande