नांदेडमध्ये पर्यावरण संवर्धनाचे मोठे पाऊल;हरित नांदेड अभियानाला वेग
नांदेड, 03 ऑगस्ट (हिं.स.)।नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, गुरुद्वारा लंगर सहीब व वृक्ष मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त पुढाकाराने हरित नांदेड अभियानाला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, महानगरपालिकेच्या क्षेत्रिय कार्यालय क्रमांक ३ शिवाजी नगर यां
अ


नांदेड, 03 ऑगस्ट (हिं.स.)।नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, गुरुद्वारा लंगर सहीब व वृक्ष मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त पुढाकाराने हरित नांदेड अभियानाला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, महानगरपालिकेच्या क्षेत्रिय कार्यालय क्रमांक ३ शिवाजी नगर यांच्या वतीने पावडेवाडी नाका ते छत्रपती चौक या मुख्य मार्गावर ट्री गार्डसह तब्बल १५० मोठ्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

लोकप्रतिनिधी, महानगरपालिका प्रशासन, वृक्षमित्र फाउंडेशन, विविध सामाजिक संस्था, एनसीसी विद्यार्थी आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरला. या कार्यक्रमास महापौर सौ.कविता संतोष मुळे, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, उपमहापौर दिपकसिंह रावत, विधानपरिषद आमदार अमर राजुरकर, माजी सभापती किशोर स्वामी, माजी महापौर शिला किशोर भवरे, नगरसेवक सतीश देशमुख, अभिषेक सौदे, राजेश यन्नम, मिलिंद देशमुख,अमृता बजरंगसिंह ठाकुर, सत्यपाल सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य उद्यान अधीक्षक डॉ.मिर्झा फरहतुल्ला बेग यांनी अभियानाची माहिती देताना शहरात १० हजार वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामार्फत वॉर्डनिहाय नियोजन करून हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. महापौर सौ.कविता संतोष मुळे यांनी जागतिक मैत्री दिनाचे औचित्य साधत वृक्षांशी मैत्री करा असा संदेश दिला. वृक्ष लागवडी बरोबरच त्यांचे संगोपन आणि संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे महानगरपालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी शहरात सध्या ३.१७ लाख वृक्ष असून शहराचे वृक्षाच्छादन ८.५ टक्के असल्याची माहिती दिली. लोकसहभागातून वृक्ष लागवड व संगोपन झाल्यास पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळेल, असे सांगत त्यांनी नागरिकांना अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.

वृक्षमित्र फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष मुगटकर यांनी गेल्या सात वर्षांपासून महानगरपालिका, लोकप्रतिनिधी आणि विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या वृक्षसंवर्धन उपक्रमांचा आढावा घेतला. आगामी काळात शालेय विद्यार्थी, महिला, पर्यावरणप्रेमी नागरिक आणि सामाजिक संस्थांचा सहभाग आणखी वाढवून हरित नांदेड अभियान अधिक व्यापक करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक नांदेड घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरत असून, लोकसहभागातून वृक्षसंवर्धनाची चळवळ अधिक बळकट होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande