
कोल्हापूर, ३ ऑगस्ट (हिं.स.) : कागल तालुक्यातील सुळकुड येथील श्रीकृष्ण तरुण मंडळ गल्लीमध्ये विजेच्या ११ केव्ही उच्चदाब वाहिनीच्या संपर्कात आल्याने नऊ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मृत बालकाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. शर्विल सागर महादेव असे मृत बालकाचे नाव आहे. रविवारी (दि. २ ऑगस्ट) दुपारी चारच्या सुमारास खेळताना ही दुर्घटना घडली. मंत्री हसन मुश्रीफ यांनी महादेव कुटुंबीयांची भेट घेऊन नामदार हसन साहेब मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने ५१ हजार रुपयांचा तातडीच्या मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण गल्लीमधून जाणारी ११ केव्ही उच्चदाब क्षमतेची वीजवाहिनी उघड्यावर असल्याचे सांगण्यात आले. कुमार जीवन शिक्षण विद्यामंदिरमध्ये इयत्ता चौथीत शिकणारा शर्विल आपल्या मित्रांसोबत एका इमारतीवर लपंडाव खेळत होता. त्यावेळी त्याचा उच्चदाबाच्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण आणि आजोबा असा परिवार आहे.
यावेळी महादेव कुटुंबीय व ग्रामस्थांशी संवाद साधताना मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, या घटनेतील निष्काळजीपणा व गलथान कारभारास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. तसेच महादेव कुटुंबीयांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
दोषींवर कठोर कारवाईची ग्रामस्थांची मागणी
श्रीकृष्ण तरुण मंडळ गल्लीतील उघड्यावर असलेल्या ११ केव्ही उच्चदाब वीजवाहिनीबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी मंत्री मुश्रीफ यांच्याकडे केली.
यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी महावितरणच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच तहसीलदार अमरदीप वाकडे आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करून कुटुंबीयांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी क्रांतीकुमार पाटील, गोटू देशपांडे, भीमगोंडा पाटील, नितीन कांबळे, सुरेश घाटे, सुधीर महादेव, अनिल महादेव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar