नांदेडमधील अतिक्रमणांवर मनपाची धडक कारवाई
नांदेड, 03 ऑगस्ट (हिं.स.) : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेने इदगाह कमान रोड ते बोंढार बायपास रस्त्यावरील अतिक्रमणांवर मोठी कारवाई करत अनेक वर्षांपासून असलेली अतिक्रमणे जमीनदोस्त केली. शहरातील इतर भागांतही मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने धडक मोहीम राब
अ


नांदेड, 03 ऑगस्ट (हिं.स.) : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेने इदगाह कमान रोड ते बोंढार बायपास रस्त्यावरील अतिक्रमणांवर मोठी कारवाई करत अनेक वर्षांपासून असलेली अतिक्रमणे जमीनदोस्त केली. शहरातील इतर भागांतही मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने धडक मोहीम राबवली.

मंजूर विकास आराखड्यातील रस्ता रुंदीकरणाच्या कामाला अडथळा ठरणाऱ्या इदगाह कमान ते बोंढार बायपास मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी महानगरपालिकेने विशेष मोहीम हाती घेतली. मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आणि पोलीस अधीक्षक डॉ. निलभ रोहन यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मनपाच्या पथकाने जे.सी.बी.च्या साहाय्याने या मार्गावरील अनेक वर्षांपासून असलेली पक्की व कच्ची अतिक्रमणे हटवली. इदगाह कमान ते बोंढार बायपास हा रस्ता मंजूर विकास आराखड्यानुसार ६० फुटांचा करण्यात येणार असून, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे.

मात्र, रस्त्याच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणांमुळे मागील दोन वर्षांपासून हे काम रखडले होते. काही स्थानिकांनी रस्त्याच्या जागेत सुमारे ३३ फुटांपर्यंत अतिक्रमण करून घरे, शेड्स आणि दुकानांचे वाढीव भाग उभारले होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रव्यवहारानंतर मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई करत या मार्गावरील सुमारे १० ते १५ पक्क्या बांधकामांसह अनधिकृत शेड्स आणि दुकानांचे वाढीव भाग हटवले. या कारवाईनंतर रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक जागा मोकळी करण्यात आली आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande