
रायगड, 03 ऑगस्ट (हिं.स.)। : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे उत्कृष्ट ज्येष्ठ पंच म्हणून गौरविण्यात आलेले तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सेवानिवृत्त अधिकारी आणि रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील न्यू यंग पिंपळपाडा संघाचे क्रीडा संघटक हिरामण भोईर यांचा न्यू यंग पिंपळपाडा संघाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
यापूर्वी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हिरामण भोईर यांचा उत्कृष्ट ज्येष्ठ पंच म्हणून सन्मान करण्यात आला होता. त्याबद्दल न्यू यंग संघाने त्यांचा विशेष गौरव करून त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा सन्मान केला.
या सत्कार समारंभात संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता पाटील, अध्यक्ष गजानन पाटील, खजिनदार सुनील पाटील यांच्या हस्ते हिरामण भोईर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे पदाधिकारी मंगेश पाटील, निलेश पाटील, सेवानिवृत्त सैनिक प्रदीप भगत, सचिन पाटील तसेच संघाचे खेळाडू आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी दत्ता पाटील, गजानन पाटील आणि प्रविण पाटील यांनी उपस्थित खेळाडूंना कबड्डी खेळातील शिस्त, मेहनत आणि सातत्याचे महत्त्व सांगत मार्गदर्शन केले. सत्काराला उत्तर देताना हिरामण भोईर यांनी आपल्या यशाचे श्रेय स्वर्गीय वसंत भगत यांना देत त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपण या उंचीपर्यंत पोहोचल्याचे नमूद केले. तसेच न्यू यंग पिंपळपाडा संघाचे पदाधिकारी, खेळाडू आणि ग्रामस्थांनी केलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. क्रीडा क्षेत्रात पंच म्हणून केलेल्या उल्लेखनीय योगदानामुळे हिरामण भोईर यांचा हा सन्मान परिसरातील युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)