सोलापूर-७५ टक्के उपस्थितीशिवाय परीक्षेला प्रवेश नाही; विद्यापीठाचे महाविद्यालयांना निर्देश
सोलापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत कठोर भूमिका घेतली असून, किमान ७५ टक्के उपस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Univerisity Solapur


सोलापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत कठोर भूमिका घेतली असून, किमान ७५ टक्के उपस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यासाठी संलग्नित महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन उपस्थितीची माहिती नियमितपणे विद्यापीठाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षात दोन सत्रांमध्ये सुमारे ९० दिवसांच्या अंतराने परीक्षा घेतल्या जातात. नियमानुसार परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची किमान ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाविद्यालयांनी उपस्थितीची माहिती ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाकडे सादर करावी लागणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी ११५ महाविद्यालये संलग्न असून त्यामध्ये सुमारे ७० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनानंतर अनेक विद्यार्थी नियमित वर्गांना उपस्थित राहत नसल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक उपस्थिती अनिवार्य करण्याबरोबरच प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश दिले होते. मात्र, हा निर्णय खर्चिक असल्याचे सांगत महाविद्यालयांनी त्यासाठी मुदतवाढ आणि शिथिलतेची मागणी केली होती. महाविद्यालयांची भूमिका लक्षात घेऊन विद्यापीठाने निर्णयात काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. त्यानुसार बायोमेट्रिक उपस्थितीबाबतचा निर्णय पुढे ढकलण्यात आला असून, परीक्षेच्या काळात प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande