
पुणे, 03 ऑगस्ट (हिं.स.)।
मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून, धरणातील पाणीसाठा ९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून पवना नदीपात्रात ५ हजार ७२० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीला पूर आला असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहर, एमआयडीसी परिसर तसेच मावळ तालुक्यातील अनेक गावांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे.
जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. परिस्थितीनुसार नदीपात्रातील विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवून तो १५ हजार क्युसेकपर्यंत नेण्याची शक्यता आहे.
सततच्या पावसामुळे नदी, नाले आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या सखल भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी नदीपात्रातील साहित्य, शेती अवजारे, कृषी पंप आणि जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु