
सोलापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)।
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थ्यांना कमी खर्चात दर्जेदार घरकुल कसे उभारावे, याचे मार्गदर्शन करण्यासाठी दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या शेजारी उभारण्यात आलेले डेमो हाऊस सध्या कॅंटीन म्हणून वापरले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची टीका पंचायत समिती सदस्यांकडून होत आहे.
ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना सुमारे १ लाख ९० हजार रुपयांच्या अनुदानात घरकुलाचे बांधकाम कसे करावे, याचा प्रत्यक्ष नमुना पाहता यावा, या उद्देशाने डेमो हाऊस उभारण्यात आले होते. मात्र, सध्या या इमारतीत महिला बचत गटामार्फत कॅंटीन सुरू असल्याने लाभार्थ्यांना डेमो हाऊस पाहण्याची संधी मिळत नसल्याची तक्रार आहे.
याबाबत गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सांगितले की, ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाच्या इमारतीचे नूतनीकरण सुरू असल्याने तात्पुरत्या स्वरूपात महिला बचत गटाला डेमो हाऊसमध्ये कॅंटीन चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. कार्यालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर बचत गट पूर्वीच्या जागी स्थलांतरित होईल. शासनाच्या निर्णयानुसार भविष्यात अशा डेमो हाऊसचा वापर महिला बचत गटांच्या व्यवसायासाठीही करता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, डेमो हाऊसचा वापर मूळ उद्देशासाठीच व्हावा, अशी मागणी काही पंचायत समिती सदस्यांनी केली आहे. लोकप्रतिनिधींच्या सूचनेवरून डेमो हाऊस कॅंटीनसाठी उपलब्ध करून दिल्याची चर्चा असून, सुमारे दोन लाख रुपये खर्चून उभारलेल्या या इमारतीचा वापर अन्य कारणासाठी होत असल्याने शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, लाभार्थ्यांना डेमो हाऊस प्रत्यक्ष पाहून घरकुल बांधणीची माहिती मिळावी की त्याचा पर्यायी वापर सुरू ठेवावा, याबाबत आता प्रशासनाची पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड