सोलापूर-पावसाचा डाळिंब बाजारावर परिणाम; आवक वाढल्याने दरात मोठी घसरण
सोलापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)आंध्र प्रदेश, ओडिशा आणि आसाम या राज्यांमध्ये सुरू असलेल्या पावसाचा परिणाम डाळिंब बाजारावर झाला असून, मागणी घटल्याने आणि बाजारातील आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. तेल्या रोगाच्या भीतीने शेतकरीही मोठ्या प्रमाणात डाळिं
APMC 2 Solpaur


सोलापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)आंध्र प्रदेश, ओडिशा आणि आसाम या राज्यांमध्ये सुरू असलेल्या पावसाचा परिणाम डाळिंब बाजारावर झाला असून, मागणी घटल्याने आणि बाजारातील आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. तेल्या रोगाच्या भीतीने शेतकरीही मोठ्या प्रमाणात डाळिंब विक्रीसाठी बाजारात आणत असल्याने बाजारभावावर आणखी दबाव निर्माण झाला आहे.

पंधरा दिवसांपूर्वी प्रतिकिलो १२० ते १४० रुपये दराने विकले जाणारे उत्तम प्रतीचे डाळिंब सध्या ८० ते ९० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. तर मध्यम प्रतीच्या डाळिंबाला ६० ते ६५ रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याची माहिती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ विभागाचे अध्यक्ष फय्याज बागवान यांनी दिली.

सोलापूर बाजार समितीतून आंध्र प्रदेश, ओडिशा आणि आसाम या राज्यांत मोठ्या प्रमाणात डाळिंबाची निर्यात केली जाते. मात्र, त्या भागांतील सततच्या पावसामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी कमी केल्याने डाळिंबाच्या मागणीत घट झाली आहे. याचवेळी बागांमध्ये तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी तयार माल तातडीने बाजारात पाठवत आहेत. त्यामुळे उत्तम प्रतीच्या डाळिंबाची आवक वाढून बाजारात पुरवठा अधिक झाला आहे.

दरम्यान, सध्याच्या घसरणीनंतर महिनाअखेरीस मागणीत सुधारणा होऊन डाळिंबाच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज फळ विभागाचे अध्यक्ष फय्याज बागवान यांनी व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande