

रोहित पवार व हर्षवर्धन सपकाळ यांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका
रायगड, 03 ऑगस्ट (हिं.स.)। शेतकरी कामगार पक्षाचा (शेकाप) ७९ वा वर्धापन दिन खालापूर तालुक्यात मोठ्या उत्साहात आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. या मेळाव्यात पक्षाच्या नेत्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत स्मार्ट मीटर योजनेविरोधात राज्यव्यापी जनआंदोलन छेडण्याची घोषणा केली. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, राज्य कार्याध्यक्ष जयंत पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा शिवानी जंगम यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील भाजप सरकारच्या धोरणांवर कठोर शब्दांत टीका केली. वाढती महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या भाषणातील काही विधानांमुळे सभेत जोरदार घोषणाबाजी झाली आणि वातावरण चांगलेच तापले.
आमदार रोहित पवार यांनी आपल्या भाषणात दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या युवकांचा उल्लेख करत, अन्यायाविरुद्ध लढण्याचे आवाहन केले. अपना दिन आएगा नाही, आता आपले दिवस आले आहेत, असे म्हणत त्यांनी उपस्थित युवकांमध्ये उत्साह निर्माण केला.
शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी स्मार्ट मीटर योजनेला तीव्र विरोध दर्शवत राज्यभर जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे, यासाठी संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)