चिपळूण-गुहागरमधून वीर जवानांसाठी ४ हजार राख्या पाठवण्याचा संकल्प!
रत्नागिरी, 3 ऑगस्ट (हिं.स.) । भारतीय जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चिपळूण व गुहागर तालुक्यातून यंदा ४ हजार राख्या पाठवण्याचा संकल्प समाजसेवक विनेश मोहिते सामाजिक विकास ग्रुपने केला आहे. हा उपक्रम सलग पाचव्या वर्षी राबविण्यात येत असून यंदा
चिपळूण-गुहागरमधून वीर जवानांसाठी ४ हजार राख्या पाठवण्याचा संकल्प!


रत्नागिरी, 3 ऑगस्ट (हिं.स.) । भारतीय जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चिपळूण व गुहागर तालुक्यातून यंदा ४ हजार राख्या पाठवण्याचा संकल्प समाजसेवक विनेश मोहिते सामाजिक विकास ग्रुपने केला आहे. हा उपक्रम सलग पाचव्या वर्षी राबविण्यात येत असून यंदा तो अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे.

देशाच्या रक्षणासाठी ऊन, वारा, पाऊस तसेच बर्फाच्छादित भागात तैनात असलेल्या जवानांपर्यंत रक्षाबंधनाचा स्नेह आणि भावंडांच्या प्रेमाचा संदेश पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमासाठी चिपळूण व गुहागर तालुक्यातील विविध गावे, वाड्या, ग्रामपंचायती, महिला बचत गट तसेच शाळा आणि महाविद्यालयांमधून राख्यांचे संकलन करण्यात येणार आहे. येत्या ७ ऑगस्ट रोजी गुहागर, मिरजोळी आणि कादवड येथे विशेष कार्यक्रम आयोजित करून राख्या संकलित करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक विकास ग्रुपचे मुख्य प्रवर्तक विनेश मोहिते यांनी दिली. या देशप्रेमाच्या उपक्रमात समाजातील सर्व घटकांनी, विशेषतः विद्यार्थी आणि युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या उपक्रमात माजी सैनिक संभाजी चव्हाण, विद्यमान सैनिक इक्बाल चिपळूणकर, तसेच राजेश कोकरे, विजय खरात, साद कडवेकर, जितेंद्र कांबळे, प्रसाद वनगे, सुधीर मोरे, समीर कदम आदींचा सहभाग आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सामाजिक संस्था, महिला मंडळे, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन वीर जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande