पोलीस दलात आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरावर भर आवश्यक : अधिकाऱ्यांचे कर्तव्य मेळाव्यात मत
कोल्हापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। बदलत्या तांत्रिक युगात पोलीस दलाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ड्रोन, वैज्ञानिक तपास पद्धती आणि सायबर सुरक्षेसारख्या आधुनिक साधनांचा प्रभावी वापर करून अधिक सक्षम व तंत्रसज्ज होणे काळाची गरज असल्याचा सूर 21 व्या कोल्हापूर
कोल्हापूर परीक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा


कोल्हापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। बदलत्या तांत्रिक युगात पोलीस दलाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ड्रोन, वैज्ञानिक तपास पद्धती आणि सायबर सुरक्षेसारख्या आधुनिक साधनांचा प्रभावी वापर करून अधिक सक्षम व तंत्रसज्ज होणे काळाची गरज असल्याचा सूर 21 व्या कोल्हापूर परीक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा–2026 च्या उद्घाटन समारंभात उमटला.

या प्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्र. कुलगुरू ज्योती जाधव तसेच अपर पोलीस अधीक्षक अण्णा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापूर परीक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील पोलीस अधिकारी, अंमलदार आणि खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी पोलीस कर्तव्य मेळाव्यांमुळे पोलीस दलाचे ज्ञान, कौशल्य आणि कार्यक्षमता वाढण्याबरोबरच अनुभवांची देवाणघेवाण होऊन तपास प्रक्रियेत अधिक गुणवत्ता येत असल्याचे सांगितले.

विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पोलीस कर्तव्य मेळावा हा पोलीस दलाच्या व्यावसायिक कौशल्यवृद्धीसाठी महत्त्वाचा उपक्रम असल्याचे सांगितले. गुन्हे प्रतिबंध आणि गुन्ह्यांच्या तपासात कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, वैज्ञानिक तपास, पोलीस छायाचित्रण, व्हिडीओग्राफी, संगणक जागरूकता आणि श्वानपथकाचा प्रभावी वापर अनिवार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्पर्धकांनी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवून परीक्षेत्राचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी गुन्हे तपास, कायदा व सुव्यवस्था आणि सायबर सुरक्षेसारख्या क्षेत्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर देत नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता वाढविणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी पोलीस दल हे केवळ कायद्याच्या अंमलबजावणी पुरतेच मर्यादित नसून नसून समाजात न्याय, सुरक्षितता आणि विश्वास निर्माण करणारी जबाबदार संस्था असल्याचे अधोरेखित केले. सायबर गुन्हे, डिजिटल पुरावे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने सातत्याने अद्ययावत राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील पोलीस अंमलदार आकाश काशिद यांनी काही मिनिटांत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे रेखाचित्र साकारून उपस्थितांची वाहवा मिळविली.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande