‘आदिवासी’ म्हणून जनगणनेत धर्माची नोंद करण्याची मागणी
यवतमाळ, 03 ऑगस्ट (हिं.स.) आदिवासी समुदायाला चालेल असा सर्व समावेशक ‘आदिवासी धर्म’ हाच शब्द निर्विवादित आहे. हाच शब्द सर्व जमातींना लागू होणारा, सर्व परिचित असून, या शब्दात तुमच्या अधिवासाचा संदर्भ व्यक्त करण्याचा अर्थ परिपूर्ण आहे. म्हणून सर्वा
‘आदिवासी’ म्हणून जनगणनेत धर्माची नोंद करावी गीताश्री उराव : आदिवासी धर्म चिंतन परिषदेत एल्गार


यवतमाळ, 03 ऑगस्ट (हिं.स.)

आदिवासी समुदायाला चालेल असा सर्व समावेशक ‘आदिवासी धर्म’ हाच शब्द निर्विवादित आहे. हाच शब्द सर्व जमातींना लागू होणारा, सर्व परिचित असून, या शब्दात तुमच्या अधिवासाचा संदर्भ व्यक्त करण्याचा अर्थ परिपूर्ण आहे. म्हणून सर्वांनी येणार्!या जनगणनेच्या नोंदीत धर्माच्या कॉलम मध्ये ‘आदिवासी धर्म’ याचाच उल्लेख करावा, असे मत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा गीताश्री उराव यांनी केले. शहरातील बलवंत मंगल कार्यालयात राज्यस्तरीय आदिवासी धर्म चिंतन परिषद पार पडली. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली व बिरसा क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या परिषदेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, तर उद्घाटन माजी मंत्री तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा गीताश्री उरांव यांनी केले. अस्तित्वाची दावेदारी सिद्ध करण्यासाठी जनगणनेत ‘आदिवासी धर्म’ याचीच नोंद करावी लागेल. सर्व आदिवासींनी जनगणनेतील सातव्या क्रमांकाच्या इतरच्या कॉलम मध्ये ‘आदिवासी धर्म’ अशाच प्रकारची नोंद करावी, असे असे परखड मत अध्यक्ष शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केले. यावेळी दशरथ मडावी, माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके, अॅड. रामू टेकाम, रामसाहेब चव्हाण, डी. बी. अंबुरे, जितेंद्र मोघे, नंदिनी टारफे यांच्यासह इतरही मान्यवर होते.

जगातील सर्व मानवी समूहाने ज्या भौगोलिक वातावरणात राहतो, त्या पद्धतीनेच आपल्या चालीरीती मूल्य विकसित केले. कालांतराने त्याचेच संस्कृतीत रूपांतर झाले. समाजातील बुद्धिजीवी वर्गाने त्यात सुसूत्रता आणून त्यालाच धार्मिक अधिष्ठानाचे स्वरूप दिले. आता हीच खरी वेळ असल्याचे उद्घाटक गीताश्री उराव म्हणाल्या. जगाच्या पाठीवरील संपूर्ण आदिवासींचे चालीरीती ह्या निसर्गाला अनुसरूनच आहेत. निसर्गाला केंद्रस्थानी म्हणूनच समाजाच्या सर्व रीती-रिवाज चालीरीती असतात. त्या अधिक शास्त्रशुद्ध असल्याचे माजी मंत्री वसंतराव पुरके म्हणाले.

सांस्कृतिक ओळख हीच आदिवासींची खरी ओळख असून, ती शाश्वत असल्याचे मत रामू टेकाम यांनी व्यक्त केले. जनगणनेत आदिवासी समाजाला स्वतंत्र धर्म कोड द्यावा, अशी मागणी करावी लागेल, असे दशरथ मडावी म्हणाले. यावेळी कार्यक्रमात सुनील ढाले, नारायण श्रीराम, माणिकराव मेश्राम, राम मिरासे, एम. के. कोडापे, विजयराव खूपसे, गणपत गव्हाळे, भगवानराव कोकाटे यांचेसह हजारो आदिवासी नागरिक उपस्थित होते.

हात उंचावून घेतला ठराव जनगणनेत ‘आदिवासी धर्म’ याचीच नोंद करण्याचा मुद्दा परिषदेत मांडण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वांनी हात उंचावून व होकार दर्शवून या ठरावाला मंजुरी दिली. सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande