
बीड, 3 ऑगस्ट (हिं.स.) : पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बीडतर्फे ‘प्रोजेक्ट – वृक्षारोपण व संगोपन’ हा उपक्रम ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेअंतर्गत जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात आला. या अभियानांतर्गत महाजनवाडी, म्हाळस जवळा, मांजरसुंबा आणि नाथापूर येथील शाळांमध्ये 350 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि रोटरी क्लबचे सदस्य यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आईच्या नावाने एक झाड दत्तक घेण्यास प्रोत्साहन देण्यात आले. प्रत्येक रोपावर संबंधित विद्यार्थ्याच्या आईच्या नावाचा टॅग लावून त्या झाडाच्या संगोपनाची जबाबदारी विद्यार्थ्यांकडे सोपविण्यात आली.
वृक्षांचे पर्यावरणीय, सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच वृक्षसंवर्धनाची सामूहिक शपथ देत झाडांचे संरक्षण करण्याचा संकल्प करण्यात आला. शाळा प्रशासनाने लावलेल्या वृक्षांच्या नियमित संगोपनाची जबाबदारी स्वीकारत त्याबाबत वेळोवेळी प्रगती अहवाल देण्याचे आश्वासन दिले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने संबंधित गावांमध्ये जनजागृती करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांची निवड, स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि वृक्षलागवडीसोबत संगोपनावर दिलेला भर ही या उपक्रमाची वैशिष्ट्ये ठरली.
या अभियानाचे नियोजन आणि अंमलबजावणी रोटरी क्लब ऑफ बीडचे अध्यक्ष सीए गोपाल लड्डा, सचिव सुहास बेदरे, प्रकल्प प्रमुख प्रा. अभय पटवारी आणि विवेक बडगे यांनी केली. विकास उमापूरकर आणि प्रमोद करमाळकर यांनी समन्वय, प्रत्यक्ष वृक्षारोपण आणि व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
‘एक पेड माँ के नाम’ संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
या उपक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या नावाने एक झाड दत्तक घेत त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. प्रत्येक रोपावर आईच्या नावाचा टॅग लावून झाडाशी भावनिक नाते जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या संकल्पनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होण्याबरोबरच कुटुंबीयांप्रती जिव्हाळा आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ झाल्याचे आयोजकांनी सांगितले.
‘झाड लावा, झाड जगवा’ हा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणाऱ्या या उपक्रमामुळे हरित बीडच्या संकल्पनेला बळ मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis