शिंदी बुद्रूकमध्ये सहा वर्षांपासून ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना ठप्प
अमरावती, 3 ऑगस्ट (हिं.स.) : प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा योजना राबविली जात असताना अमरावती जिल्ह्यातील शिंदी बुद्रूक हे गाव याला अपवाद ठरले आहे. गेल्या सहा वर्षांपासून गावात ग्रामपंचायतीची कोणतीही नियमित पाणीपुरवठा योजना कार्यान्वित
शिंदीचे नागरिक पाणीपुरवठ्यापासून वंचित सहा वर्षांपासून खासगी बोअरचा आधार, कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी


अमरावती, 3 ऑगस्ट (हिं.स.) : प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा योजना राबविली जात असताना अमरावती जिल्ह्यातील शिंदी बुद्रूक हे गाव याला अपवाद ठरले आहे. गेल्या सहा वर्षांपासून गावात ग्रामपंचायतीची कोणतीही नियमित पाणीपुरवठा योजना कार्यान्वित नसल्याने सुमारे आठ हजार लोकसंख्या असलेल्या गावातील नागरिक खासगी बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याची गरज भागवत आहेत.

सुमारे सहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या बोअरवेलद्वारे गावाला पाणीपुरवठा केला जात होता. मात्र कालांतराने भूजल पातळी खालावल्याने बोअरवेल कोरडी पडली आणि गावात पाणीटंचाई निर्माण झाली. त्यानंतर शासनाच्या नियमानुसार 200 फूट खोलीपर्यंत नवीन बोअरवेल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्या खोलीवरही पाणी उपलब्ध न झाल्याने आणि तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे ही योजना पुढे सरकू शकली नाही.

या परिस्थितीत गावकऱ्यांनी पुढाकार घेत सामूहिकरीत्या जागा निश्चित करून खासगी बोअरवेल उभारण्यास सुरुवात केली. आज गावात जवळपास 50 खासगी बोअरवेल कार्यरत असून त्यांच्याच माध्यमातून नागरिकांचा पाणीपुरवठा सुरू आहे.

मात्र, अलीकडच्या काळात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे भर पावसातही ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांना स्वतः महावितरणशी संपर्क साधून पाठपुरावा करावा लागत असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना संथगतीने

ग्रामपंचायत अधिकारी वैशाली बोरोडे-वाठ यांनी सांगितले की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत गावासाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्याचे काम सुरू आहे. मात्र कामाची गती संथ असल्याने योजना पूर्ण होईपर्यंत नागरिकांना खासगी बोअरवेलवरच अवलंबून राहावे लागणार आहे. या कामाचा सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी देखभाल

सुरू

महावितरणचे सहायक अभियंता प्रयास मांडवे यांनी सांगितले की, पावसाळ्यात वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. ग्राहकांची गैरसोय कमी करण्यासाठी आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा अधिक सुरळीत होईल.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande