
रायगड, 03 ऑगस्ट (हिं.स.)। : सामाजिक बांधिलकी जपत समाजाप्रती उत्तरदायित्वाची जाणीव ठेवणाऱ्या ब्लॉसम ब्युटी सलोन अँड अकॅडमीने आपल्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त सोगाव येथील SOS अनाथ आश्रमातील मुलींसाठी मोफत हेअर कटिंग शिबिराचे आयोजन केले. हा सेवाभावी उपक्रम नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
ब्लॉसम ब्युटी सलोन अँड अकॅडमीच्या संचालिका सौ. सपना नितीन खाडे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात आश्रमातील मुलींना व्यावसायिक पद्धतीने मोफत हेअर कटिंगची सेवा देण्यात आली. यामध्ये सौ. माधुरी संजय माने, श्रद्धा जितेंद्र देवकर, समृद्धी अजित मेंडगे, श्रुतिका विजय कदम, दीपश्री प्रणय थळे, तनिषा भास्कर बाणकोटकर, प्रिया पांडुरंग मयेकर आणि साक्षी संजय पाटील यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मुलींची हेअर कटिंग सेवा पार पाडली.
या उपक्रमासाठी सोगाव येथील SOS अनाथ आश्रमाचे व्यवस्थापक श्री. सुजय यांनी विशेष सहकार्य केले. सलोनच्या दहाव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून समाजातील गरजू मुलींना उपयुक्त सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
ब्लॉसम ब्युटी सलोन अँड अकॅडमीतर्फे दरवर्षी वर्धापनदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. ब्युटी क्षेत्रातील सेवा समाजातील वंचित आणि गरजू घटकांपर्यंत पोहोचवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संस्थेचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. भविष्यातही अशाच प्रकारचे सेवाभावी आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)