लातूरात एका दिवसात 11 शाळा, महाविद्यालयांना भेट देत 3909 विद्यार्थ्यांशी पोलीसांचा थेट संवाद
लातूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दि. 01 ऑगस्ट 2026 पासून सुरू करण्यात आलेल्या ''पोलीस विद्यार्थी संवाद'' या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
पोलीस विद्यार्थी संवाद


लातूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)।

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दि. 01 ऑगस्ट 2026 पासून सुरू करण्यात आलेल्या 'पोलीस विद्यार्थी संवाद' या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज रोजी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांनी 11 शाळा व महाविद्यालयांना भेट देऊन एकूण 3909 विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.

या संवादादरम्यान विद्यार्थ्यांना नशामुक्त भारत अभियान ( अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम ), भारतीय न्यायव्यवस्थेतील नवीन कायदे, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय, एनडीपीएस कायदा, पोक्सो कायदा, वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्ट वापरण्याचे महत्त्व आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून कायद्याबाबत जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमांतर्गत पोलीस स्टेशन गांधी चौक हद्दीतील व्यंकटेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे सपोनि श्री. करे, विवेकानंद चौक पोलीस स्टेशन हद्दीतील जिजामाता विद्यालय येथे सपोनि श्री. उजगरे, एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील स्वामी विवेकानंद विद्यालय, जेएसपी कॅम्प येथे पोनि श्री. चवरे, कासार शिरसी पोलीस स्टेशन हद्दीतील रहमानिया उर्दू शाळा येथे सपोनि श्री. गर्जे, औराद शहाजनी पोलीस स्टेशन हद्दीतील एमडीएम कॉलेज येथे सपोनि श्री. बांगर, उदगीर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजीराजे महाविद्यालय येथे सपोनि श्री. कारवार, शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशन हद्दीतील विवेकानंद विद्यालय, निटूर येथे पोनि श्री. भंडे, किनगाव पोलीस स्टेशन हद्दीतील भगवान विद्यालय येथे सपोनि श्री. डोके तसेच वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजी विद्यालय, हंडरगुळी येथे सपोनि श्री. गायकवाड, मुरुड पोलीस स्टेशन हद्दीतील मौलाना आझाद उर्दू स्कूल येथे सपुने श्री अंधारे, पोलीस स्टेशन किल्लारी हद्दीमध्ये महाराष्ट्र विद्यालय येथे सपोनी श्री जाधव, पोलीस स्टेशन जळकोट हद्दीतील राजश्री माध्यमिक विद्यालय येथे पोउपनी श्री राठोड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.

या उपक्रमाचा नियमित आढावा पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे घेत असून, पोलीस व विद्यार्थ्यांमधील संवाद अधिक प्रभावी, विश्वासार्ह आणि परिणामकारक होऊन विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबद्दल जागरूकता, सामाजिक उत्तरदायित्व व सकारात्मक बदल घडावेत, यासाठी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande