अमरावतीत सहावा ‘रानभाजी महोत्सव’ उत्साहात
अमरावती, 3 ऑगस्ट (हिं.स.) : आधुनिक जीवनशैलीत वाढत्या जंक फूडच्या प्रभावामुळे दुर्लक्षित होत चाललेल्या औषधी गुणधर्मांनी समृद्ध रानभाज्यांचे महत्त्व विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंट आणि श्री विश्वकृपा आ
अमरावतीत सहावा ‘रानभाजी महोत्सव’ उत्साहात


अमरावती, 3 ऑगस्ट (हिं.स.) : आधुनिक जीवनशैलीत वाढत्या जंक फूडच्या प्रभावामुळे दुर्लक्षित होत चाललेल्या औषधी गुणधर्मांनी समृद्ध रानभाज्यांचे महत्त्व विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंट आणि श्री विश्वकृपा आयुर्वेदालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहावा ‘रानभाजी महोत्सव’ उत्साहात पार पडला. ‘साद आरोग्याची... वाट निसर्गाची...’ या ब्रीदवाक्याखाली आयोजित महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महोत्सवाचे उद्घाटन निमा आयुर्वेद फोरम महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अमोल ठवळी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर ठाकरे होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राम गोधने, सचिव अनिल गुल्हाने, कोषाध्यक्ष डॉ. वेदांत राजोरिया, माजी अध्यक्ष गोपाल वानखडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनपर भाषणात डॉ. अमोल ठवळी यांनी पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांतील औषधी गुणधर्म, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यातील त्यांचे महत्त्व आणि तरुण पिढीला पारंपरिक आहाराची ओळख करून देण्याची गरज अधोरेखित केली. गोपाल वानखडे यांनी विद्यार्थ्यांनी निसर्गाशी जोडलेले नाते जपण्याचे महत्त्व विशद केले.

महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे इयत्ता सहावी ते आठवीतील 175 विद्यार्थ्यांनी साकारलेले रानभाजी पाकप्रदर्शन. विद्यार्थ्यांनी विविध दुर्मिळ रानभाज्यांचे प्रदर्शन मांडत त्यांच्या औषधी गुणधर्मांची माहिती दिली. पालकांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेले भाजी, चटणी, पराठे, थालीपीठ, सूप, भाकरी, पुरी आणि ठेचा यांसारख्या पारंपरिक पदार्थांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

पदार्थांची पौष्टिकता, चव, सादरीकरण, स्वच्छता आणि माहितीच्या आधारे परीक्षकांनी स्पर्धेचे मूल्यमापन करून विजेत्यांची निवड केली.

स्पर्धेतील विजेते

इयत्ता सहावी :

प्रथम – मधुर अतिश लांगापुरे व यशवी मोनिक मदन

द्वितीय – लावण्या किशोर कडू व अरांशा सुनील कुकडे

तृतीय – राजवीर स्वप्नील खंडेलवाल

इयत्ता सातवी :

प्रथम – लावण्या प्रशांत वाडोदे

द्वितीय – श्रीधा देवेंद्र विधळे

तृतीय – पलाक्षी नीलेश मानेकर

इयत्ता आठवी :

प्रथम – मनस्वी महेंद्र बहुरूपी

द्वितीय – वेदिका गोवर्धन देशमुख

तृतीय – मानवी संदीप जैस्वाल व शार्दुल प्रमोद ठोंबरे

विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande