
बीड, 03 ऑगस्ट (हिं.स.)। मागील तीन दिवसांपासून झालेल्या संततधार पावसामुळे कापूस पिकावर प्रतिकूल परिणाम झाला असून अनेक ठिकाणी कापसाची झाडे अचानक सुकत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच काही भागांमध्ये लवकर लागवड करण्यात आलेल्या कापूस पिकात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर कापूस पिकाचे संरक्षण करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना एकात्मिक कीड, रोग व अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे आणि उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध उपाय सुचविले आहेत. संततधार पावसामुळे कापूस पिकामध्ये बोंडसड आणि दहिया रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. या रोगांच्या व्यवस्थापनासाठी पायरॅक्लोस्ट्रोबिन (२० टक्के डब्ल्यूजी) एक ग्रॅम किंवा मेटीराम (५५ टक्के) अधिक पायरॅक्लोस्ट्रोबिन (५ टक्के डब्ल्यूजी) हे संयुक्त बुरशीनाशक दोन ग्रॅम प्रति एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सततच्या पावसामुळे काही ठिकाणी कापसाची झाडे अचानक सुकत आहेत. या समस्येला आकस्मिक मर असे म्हटले जाते. यासाठी शेतामध्ये उताराला आडवे चर तयार करून अतिरिक्त पाण्याचा निचरा करणे आवश्यक आहे. तसेच युरिया १०० ग्रॅम, पोटॅशियम सल्फेट (००:००:५०) खत १०० ग्रॅम आणि कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम हे १० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेले द्रावण प्रति झाड १०० मिली प्रमाणे आळवणी पद्धतीने द्यावे. आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळील माती पायाने दाबून घ्यावी, असे कृषी विभागाने सांगितले आहे.
कापूस पिकात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे गेल्यास नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस ४० टक्के अधिक सायपरमेथ्रीन ४ टक्के ईसी, क्लोरअँट्रानीलिप्रोल ९.३ अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ४.६ झेडसी किंवा पायरिप्रॉक्सीफेन ५ अधिक फेनप्रोपॅथ्रीन १५ ईसी यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची शिफारशीनुसार फवारणी करावी.
पाते लागणे आणि बोंडे भरण्याच्या अवस्थेत कापूस पिकाला आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्यासाठी दोन ते तीन वेळा दोन टक्के युरिया किंवा डीएपीची फवारणी करावी. पिकामध्ये लाल्याची लक्षणे दिसल्यास मॅग्नेशियम सल्फेट दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उंच वाढलेल्या कापूस पिकावर फवारणी करताना शेतकऱ्यांनी सुरक्षितता साधनांचा वापर करावा, असे आवाहन उपविभागीय तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis