
अमरावती, 03 ऑगस्ट (हिं.स.)।
येथील देवी पॉइंटवर असलेल्या आकाशपाळण्यातून पडल्याने एक पर्यटक गंभीर जखमी झाला. रविवारी रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भारत भुजराज मेश्राम (वय २६, रा. हिवरा बु., ता. नांदगाव खंडेश्वर), असे गंभीर जखमी पर्यटकाचे नाव असून त्याच्यावर अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती चिखलदरा पोलिसांनी दिली. भारत मेश्राम हा मित्रांसह पर्यटनासाठी चिखलदऱ्याला आला होता. देवी पॉइंटवरील आकाशपाळण्याचा आनंद घेत असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो खाली कोसळला. या अपघातात त्याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. जखमीला तातडीने उपचारासाठी चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अमरावतीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चिखलदरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात नेमका कशामुळे घडला तसेच संबंधित आकाशपाळण्याच्या सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी होत्या का, याचाही तपास करण्यात येत आहे. पर्यटनस्थळांवरील आकाशपाळणे, झुले व साहसी खेळांसाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी