
यवतमाळ 03 ऑगस्ट (हिं.स.)
येथील पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या पाटण या गावी जिल्हा परिषदेची एक माध्यमिक शाळा तर एक प्राथमिक शाळा, अशा दोन जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या शाळा आहेत. या दोन्हीही शाळांना वेगवेगळ्या प्रशस्त आणि सुसज्ज इमारती आहेत. परंतु येथील माध्यमिक शाळेला शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांची गळती लागली आणि आज रोजी ही शाळा विद्यार्थ्यांअभावी शेवटच्या घटका मोजत आहे. या वर्षीच्या चालू शैक्षणिक सत्रात येथील माध्यमिक शाळेची पटसंख्या ५ वी ते ७ व्या वर्गांकरिता केवळ ६ विद्यार्थी पटावर आहेत तर ८ ते १० वी वर्गाकरिता केवळ ३० विद्यार्थी पटावर असल्याने संच मान्यता २०२५-२६ नुसार या शाळेकरीता शिक्षकाचे एकही पद मंजूर झालेले नाही. त्यामुळे शिक्षकांचे एकही पद मंजूर नसल्यामुळे २०२६-२७ या शैक्षणिक सत्रकारिता असलेल्या प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल आणि प्रवेशाचे प्रमाण कमी होऊन भविष्यात ही शाळा बंद पडेल आणि याच शाळेला पी. एम. जणमनअंतर्गत १०० विद्यार्थी क्षमतेचे आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह मंजूर असून या वसतिगृहाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होत आले आहे. हे वसतिगृह सुरू झाल्यास विद्यार्थी पटसंख्या वाढेल. परंतु हल्ली या शाळेला शिक्षकांची पदे मंजूर नसल्याने विद्यार्थी प्रवेशास तयार होणार नाहीत. त्यामुळे भविष्याचा धोका बघता येथील १९१ पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता ७ व्या वर्गात ४१ विद्यार्थी प्रवेशित असल्याने या दोन्ही शाळेचे एकत्रीकरण झाल्यास पुढील वर्षी इयत्ता ८ वी ची पटसंख्या वाढेल आणि आणि संच मान्यता होईल, शिक्षक मिळेल आणि त्यामुळे तालुक्यात असलेली जिल्हा परिषदेची ही एकमेव माध्यमिक शाळा सुरू राहील, या उदात्त हेतूने या शाळेचे एकत्रीकरण करण्यात आले. परंतु हे करीत असताना या दोनही शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात घेण्यात आले नाही, असा आरोप करीत या या दोनही शाळेच्या एकत्रीकरणाचा वाद चव्हाट्ट्यावर आला असून यात माध्यमिक शाळेत प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा पालकांचा आरोप आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी