
अमरावती, 3 ऑगस्ट (हिं.स.) : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण विभागाने आणखी एक मानाचा टप्पा गाठला असून, बँकॉक येथे होणाऱ्या 12 व्या एशियन एज ग्रुप वॉटरपोलो चॅम्पियनशिपसाठी अमरावतीच्या स्वर्णीम मिलिंद चेपे, मंथन शिवणकर आणि शौर्य अमित गुप्ता यांची भारतीय संघात निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे अमरावतीच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
भारतीय संघात निवड झाल्यानंतर तिन्ही खेळाडूंनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य तसेच मंडळाच्या सचिव प्रा. डॉ. माधुरीताई चेंडके यांचे आशीर्वाद घेतले.
देशातील जलतरण आणि वॉटरपोलो प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावावर नियमित सराव करत या तिन्ही खेळाडूंनी कठोर परिश्रम, सातत्य आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळविले आहे.
या यशाचे श्रेय खेळाडूंनी मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, सचिव प्रा. डॉ. माधुरीताई चेंडके, अमरावती जलतरण संघटनेचे अध्यक्ष वसंतराव हरणे, प्रा. डॉ. टॉमी जोश, प्रा. डॉ. लक्ष्मीकांत खंडागळे, जलतरण विभागप्रमुख व प्रशिक्षक प्रा. डॉ. योगेश निर्मळ, तसेच प्रशिक्षक मयूर कुमार आणि वैभवी थेटे यांना दिले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड. प्रशांत देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे, सचिव प्रा. रवींद्र खांडेकर, डॉ. विकास कोळेश्वर तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि खेळाडूंनी तिन्ही जलतरणपटूंचे अभिनंदन करून आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी