
नंदुरबार, 3 ऑगस्ट (हिं.स.) राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी तसेच स्थानिक
पातळीवरील अल्पसंख्याकांच्या समस्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने नंदुरबार जिल्ह्यात 'जिल्हास्तरीय
अल्पसंख्यांक कल्याण समिती'ची पुनर्रचना करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नवीन 15 कलमी कार्यक्रमाची
प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ही समिती पुनर्रचित करण्यात येत असून, या समितीवर
अल्पसंख्याकांसाठी काम करणाऱ्या अशासकीय स्वयंसेवी संस्थांच्या (NGO) प्रतिनिधींची नियुक्ती
करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पात्र व इच्छुक संस्थांकडून परिपूर्ण प्रस्ताव मागविण्यात येत
असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी शशांक काळे यांनी
कळविली आहे.
राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाचे शासन निर्णय दिनांक 19 जानेवारी 2026 अन्वये
जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण
समितीची पुनर्रचना करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
प्रस्तावासोबत सादर करावयाची आवश्यक माहिती व कागदपत्रे:
शासनाच्या नियमानुसार व समितीतील तरतुदीनुसार जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी
कार्यरत असणाऱ्या इच्छुक अशासकीय स्वयंसेवी संस्थांनी खालील माहितीसह आपला परिपूर्ण प्रस्ताव
सादर करणे आवश्यक आहे:
संस्थेची माहिती: स्वयंसेवी संस्थेचे पूर्ण नाव, कार्यालयीन पत्ता, दूरध्वनी क्रमांक व अधिकृत ई-मेल
आयडी.
प्रतिनिधीची माहिती: समिती सदस्यत्वासाठी प्रस्तावित प्रतिनिधीचे नाव, पद, मोबाईल क्रमांक व
ई-मेल आयडी.
नोंदणी व दर्जा: संस्था नोंदणी क्रमांक व नोंदणी वर्ष तसेच संस्थेला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त
असल्याबाबतचा प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक.
कार्याचा तपशील: संस्थेच्या प्रतिनिधीने अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक
उन्नतीसाठी केलेल्या कामाचा सविस्तर तपशील.
इतर योगदान: अल्पसंख्याक समाजाचा सामाजिक व आर्थिक दर्जा सुधारण्यासाठी केलेल्या इतर
अनुषंगिक कार्याची माहिती.
अंतिम मुदत:
इच्छुक संस्थांनी शासन निर्णयातील सर्व सूचनांनुसार आपला परिपूर्ण प्रस्ताव दिनांक 07 ऑगस्ट, 2026
पर्यंत जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी, जिल्हा नियोजन समिती कार्यालय,
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे सादर करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन अधिकारी
तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार
यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर