पुणे–सोलापूर महामार्गाची दुरवस्था; अपघातांचा धोका वाढला
पुणे, 03 ऑगस्ट (हिं.स.)पुणे–सोलापूर महामार्गावरील हडपसर येथील रविदर्शन ते कवडीपाट टोलनाका दरम्यानचा सुमारे पाच किलोमीटरचा रस्ता खड्ड्यांमुळे अत्यंत धोकादायक बनला आहे. पावसाळ्यात रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने वाहनचालक, प्रवासी आणि स्था
पुणे–सोलापूर महामार्गाची दुरवस्था; अपघातांचा धोका वाढला


पुणे, 03 ऑगस्ट (हिं.स.)पुणे–सोलापूर महामार्गावरील हडपसर येथील रविदर्शन ते कवडीपाट टोलनाका दरम्यानचा सुमारे पाच किलोमीटरचा रस्ता खड्ड्यांमुळे अत्यंत धोकादायक बनला आहे. पावसाळ्यात रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना मार्ग काढणे कठीण होत आहे. तर पाऊस थांबल्यानंतर उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. उखडलेला डांबरी थर आणि रस्त्यावर पसरलेली खडी यामुळे दररोज किरकोळ अपघात होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सुमारे २० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेला हा रस्ता तिसऱ्यांदा उखडला आहे. याशिवाय पायलिंगसाठी खोदलेले खड्डे, पदपथ आणि सेवावाहिनीवरील राडारोडा तसेच रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीचा धोका आणखी वाढला आहे.अण्णासाहेब मगर विभागीय बाजार समितीसमोरील सततची वाहतूक कोंडीही या मार्गावरील समस्यांमध्ये भर घालत आहे. महामार्गाची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत आणि अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande