
बीड, 04 ऑगस्ट (हिं.स.)। धार्मिक माहिती देण्याच्या बहाण्याने सोशल मीडियावरून ओळख वाढवून एका महिला भाविकाला जादूटोणा करण्याची आणि पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन १ लाख ३७ हजार रुपयांची ऑनलाईन उकळती केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन भोंदूबाबांविरुद्ध फसवणूक आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अंबिका चौक भागातील रहिवासी ३१ वर्षीय गृहिणी उषा जालिंदर खामकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची जून महिन्यात इंस्टाग्रामद्वारे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील सागर गजानन जोशी आणि जिगर गजानन जोशी यांच्याशी ओळख झाली होती. सुरुवातीला देव-देवतांची माहिती देऊन आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला आणि नंतर विविध कारणांसाठी पैशांची मागणी केली. पीडित महिलेने अधिक पैसे देण्यास नकार दिला असता, आरोपींनी फोनवरून पैसे दिले नाहीस तर तुझ्यावर जादूटोणा करीन, तुझे आयुष्य उद्ध्वस्त करीन आणि तुझ्या पतीला जीवे मारीन अशी भीती दाखवून धमकी दिली.
या भीतीपोटी महिलेने ७ जून ते १६ जून दरम्यान विविध हप्त्यांमध्ये फोन पे द्वारे एकूण १ लाख ३७ हजार रुपये आरोपींनी दिलेल्या बँक खात्यांवर पाठवले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी सागर जोशी व जिगर जोशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शीतलकूमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis