
रत्नागिरी, 5 ऑगस्ट (हिं.स.) । जमिनीच्या खरेदीखताची सातबारा उताऱ्यावर नोंद करून फेरफार मंजूर करण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सावर्डे (ता. चिपळूण) येथील मंडळ अधिकारी अनिल दिलीप जाधव (वर्ग ३, महसूल विभाग) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. आज दुपारी सावर्डे येथील मंडळ अधिकारी कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी एका ४८ वर्षीय निवृत्त मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने एसीबीकडे ३ ऑगस्ट रोजी लेखी तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने त्यांच्या पत्नीच्या नावे सावर्डे येथे गट नं. १३४७/३ मधील २१८ चौ.मी. जागा खरेदीखताने विकत घेतली होती. या जागेच्या सातबारा उताऱ्यावर तलाठी यांनी फेरफार नोंद करण्यास सांगून हा फेरफार मंजूर करण्यासाठी तक्रारदाराने मंडळ अधिकारी अनिल जाधव यांची भेट घेतली. यावेळी जाधव यांनी या कामासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
या तक्रारीची पडताळणी बुधवारी पंचांसमक्ष करण्यात आली. त्यात लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तत्काळ सावर्डे येथील मंडळ अधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला. दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारून ती स्वतःजवळील नोटबुकमध्ये ठेवण्यास सांगताना जाधव याला पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक सुहास रोकडे, संजय वाघाटे, विशाल नलावडे, दीपक आंबेकर, श्रेया विचारे, हेमंत पवार, राजेश गावकर, समिता क्षीरसागर आणि प्रशांत कांबळे या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
अशा तऱ्हेची भ्रष्टाचारासंबंधी कोणतीही माहिती असल्यास किंवा कोणत्याही शासकीय कार्यालयात लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ वर किंवा रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी