
सोलापूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)।सोलापूर शहर गुन्हे शाखेने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या आठ जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात अहिल्यानगर जिल्ह्यातील चार, नाशिकमधील एक आणि सोलापूर शहरातील तीन जणांना अटक करण्यात आली असून, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील तत्कालीन निवासी वैद्यकीय अधिकारी सतीश कनाके यांना न्यायालयाने ७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. उर्वरित सात आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर येथील पाटबंधारे विभागातील लिपिक राजेश भाऊसाहेब जाधव यांनी २०१२ मध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळविले होते. नोकरीत कायम होण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन यूडीआयडी (UDID) प्रमाणपत्रासाठी त्यांचा अर्ज अहिल्यानगरमध्ये नामंजूर झाल्यानंतर त्यांनी एजंटांच्या मदतीने सोलापूरच्या पत्त्याचे बनावट आधार कार्ड तयार केले. त्यानंतर त्या आधारावर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामार्फत ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र मिळविल्याचा आरोप आहे.
या प्रकाराची तक्रार ‘सावली’ संस्थेकडून करण्यात आल्यानंतर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांनी त्रिस्तरीय चौकशी समिती नेमली. चौकशीत रुग्णालयातील तिघांचा सहभाग समोर आल्यानंतर डॉ. जयकर यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्यानंतर शहर गुन्हे शाखेने सखोल तपास करून सुमारे तीन लाख रुपयांत बनावट दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध करून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त दिलीप पवार आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
------------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड