
नांदेड, ४ ऑगस्ट (हिं.स.) :नांदेड जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांतील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक करण्यात यश मिळविले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०२/२०२६ अंतर्गत दाखल असलेल्या खून प्रकरणातील आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध सुरू होता.
दि. २१ जून २०२६ रोजी रात्री सुमारे २.०५ ते २.१० वाजण्याच्या दरम्यान बरकतपुरा-वार्ध रोडवरील अबरार फंक्शन हॉलजवळ शेख शमीम शेख इसाक हे मित्रांसोबत बसलेले असताना दोन मोटारसायकलींवरून आलेल्या चार अज्ञात इसमांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. आरोपींनी प्रथम गोळीबार करून त्यानंतर तलवार आणि खंजीराने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ३ (५) तसेच शस्त्र अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरार आरोपींचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे आणि त्यांचे पथक नांदेड शहरात गस्त घालत होते. यावेळी भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान पथकाला गोपनीय आणि तांत्रिक माहिती मिळाली की, वजिराबाद पोलीस ठाण्यातील खून प्रकरणातील फरार आरोपी गुरुजी चौक, नांदेड परिसरात आला आहे.
माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने आपली ओळख कबूल केली तसेच वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल खून प्रकरणात फरार असल्याचे मान्य केले.
सदर आरोपी मागील सुमारे दीड महिन्यांपासून सतत ठिकाणे बदलून राहत असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीचे अचूक विश्लेषण करून त्याचा माग काढत आरोपीला अटक केली. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आरोपीला वजिराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
नांदेड जिल्हा पोलीस गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सातत्याने विशेष मोहीम राबवत असून, अशा आरोपींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis