अमरावती : कोट्यवधींची फसवणूक करणारे दाम्पत्य अटकेत
अमरावती, 04 ऑगस्ट (हिं.स.)।मोर्शी शहरातील दीप कॉलनी परिसरातील एका महिलेने भरघोस परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी संबंधित महिला व तिच्या पतीला अटक केली आहे. अविनाश बुरंगे आणि त्याच्या पत्नीला
कोट्यवधींची फसवणूक करणारे दाम्पत्य अटकेत


अमरावती, 04 ऑगस्ट (हिं.स.)।मोर्शी शहरातील दीप कॉलनी परिसरातील एका महिलेने भरघोस परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी संबंधित महिला व तिच्या पतीला अटक केली आहे. अविनाश बुरंगे आणि त्याच्या पत्नीला नागपुरातून ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुरवातीला संशयित महिलेने नातेवाईक व परिचितांकडून पैसे घेऊन काहींना ठरल्याप्रमाणे जादा परतावा दिला. त्यामुळे तिच्यावर विश्वास बसलेल्या नागरिकांना ‘माझ्या भावाच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास भरघोस व्याज मिळेल, ’ असे सांगून मोठ्या प्रमाणात पैसे गुंतविण्यास प्रवृत्त करण्यात आले. अनेकांनी पाच लाखांपासून दीड कोटी रुपयांपर्यंतची रक्कम दिल्याचे समोर आले आहे. गेल्या पाच ते सात वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. गुंतवणूकदारांनी पैसे परत मागितल्यानंतर संशयितांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याची तक्रार आहे. काही नागरिकांनी पैसे मागण्यासाठी गेल्यावर मानसिक अस्वस्थतेचे नाटक केल्याचाही आरोप केला आहे.

याप्रकरणी अनेकांनी अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले. प्राथमिक तपासानंतर संशयित दाम्पत्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिस कोठडीत संशयितांनी गोळा केलेली रक्कम नेमकी कुठे गुंतवली, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शी पोलिस पुढील तपास करीत आहेत. या फसवणुकीमुळे अनेक कुटुंबांची आयुष्यभराची बचत बुडाल्याने गुंतवणूकदारांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande