
१० जनावरांची सुटका; ३१.५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
नांदेड, ४ ऑगस्ट (हिं.स.) :नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध वाहतुकीविरोधातील विशेष मोहिमेत अर्धापूर पोलिसांनी धाडसी कारवाई करत दोन बोलेरो पिकअप वाहनांमधून अवैधरित्या वाहतूक करण्यात येणाऱ्या १० गोवंश जनावरांची सुटका केली.या कारवाईत दोन बोलेरो पिकअप वाहने, दोन चारचाकी वाहने, आठ मोबाईल फोन तसेच अन्य साहित्य असा एकूण ३१ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांना गोवंश जनावरांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार अर्धापूर परिसरात सापळा रचून दोन संशयित बोलेरो पिकअप वाहनांची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये जनावरांना अत्यंत निर्दयपणे बांधून कोणत्याही प्रकारची वैद्यकीय किंवा कायदेशीर परवानगी न घेता वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जनावरांची सुटका केली आणि वाहने ताब्यात घेतली.
या प्रकरणी आठ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम १९७६, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेल्या गोवंश जनावरांची सुरक्षित व्यवस्था करण्यात आली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis