
लातूर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। शहरातील बस स्थानक परिसरात एक १७ वर्षीय मतिमंद मुलगी बऱ्याच वेळेपासून एकाच ठिकाणी थांबून असल्याची माहिती अहमदपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांना २ ऑगस्ट रोजी रात्री १०:०० वाजता फोनद्वारे मिळाली. या माहितीची तात्काळ गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक मेत्रेवार यांनी कोणतीही वेळ वाया न घालवता पोलीस पथकाला घटनास्थळी पाठवून सदरील मुलीला हसतखेळत व सुखरूपपणे पोलीस ठाण्यात आणले.
मुलगी मतिमंद असल्यामुळे ती स्वतःचे नाव किंवा घरचा पत्ता सांगण्यात असमर्थ ठरली. यामुळे तिच्या पालकांपर्यंत पोहोचणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते. आज मिळालेल्या माहितीनुसार यावर तात्काळ कारवाई करत पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्रे वेगाने हालवली. पोलीस हेडकॉन्स्टेबल तैय्यब शेख, पोलीस कॉन्स्टेबल सुग्रीव मुंडे यांच्यासह शहरातील नागरिक फारुख मनियार, निसार कुरेशी आणि जिलानी शेख यांनी मदतीचा हात पुढे करत संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली.
पोलिसांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांना अवघ्या काही वेळातच यश आले. ही मतिमंद मुलगी परळी (तालुका परळी, जिल्हा बीड) येथील असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ मुलीच्या आई वडीलांशी संपर्क साधला. अवघ्या दीड तासाच्या आत, म्हणजेच रात्री ११:३० वाजताच्या सुमारास त्या मतिमंद मुलीला तिच्या पालकांच्या सुरक्षित स्वाधीन करण्यात आले. आपल्या हरवलेल्या मुलीला कौतुकास्पद आणि सुरक्षितपणे भेटवल्याबद्दल पालकांनी व उपस्थितांनी अहमदपूर पोलिसांच्या या संवेदनशील व मानवीय कार्याबद्दल मनापासून आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis