
पुणे, ४ ऑगस्ट (हिं.स.) :देशभरातील नागरिकांना ऑनलाइन इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आणि बनावट टास्कच्या आमिषाने फसवून सुमारे १५० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीतील मुख्य ‘म्युल अकाउंट’ पुरवठादाराला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या नऊ बँक खात्यांमध्ये तब्बल १ कोटी १५ लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे तपासात उघड झाले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सचिन संजय काळे (वय २५, रा. मोशी) असे आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आळंदी पोलीस ठाण्यातील सायबर सेलने मोशी येथील गोडाऊन चौक परिसरातून त्याला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आळंदी येथील एका बँक शाखेतील बचत खात्याचा वापर ऑनलाइन फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारण्यासाठी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
पोलिसांच्या माहितीनुसार, सचिन काळे याने स्वतःच्या नावावर विविध नऊ बँकांमध्ये खाती उघडली होती. या खात्यांमध्ये सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम जमा केली जात होती. त्यानंतर आरोपी एटीएम आणि धनादेशांच्या माध्यमातून ही रक्कम काढून संबंधित सायबर टोळीपर्यंत पोहोचवत असल्याचे तपासात समोर आले आहे.
नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवरील माहितीनुसार, या रॅकेटद्वारे देशातील ६५ नागरिकांची सुमारे १५० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे दाखल असून, त्याच्या बँक खात्यांमधून १ कोटी १५ लाख रुपयांची आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, पोलीस उपायुक्त मारुती जगताप यांनी नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. आर्थिक लाभाचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगार नागरिकांची बँक खाती आणि सिमकार्ड भाड्याने किंवा वापरासाठी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँक खाते, एटीएम कार्ड किंवा सिमकार्ड वापरण्यास देऊ नये. तसेच अनोळखी स्रोताकडून आलेली रक्कम स्वीकारून ती रोख स्वरूपात काढून देणे देखील गंभीर गुन्हा ठरू शकतो, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु