राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी अमरावतीचे १२ खेळाडू महाराष्ट्र संघात
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा झेंडा, मैसूर येथे स्पर्धेचे आयोजन, प्रशिक्षकांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन अमरावती, 06 ऑगस्ट (हिं.स.) श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जिम्नॅस्टिक विभागाने पुन्हा एकदा राष्ट्रीयस्तरावर आपल्या गुणवत्तेची मोहो
राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी अमरावतीचे १२ खेळाडू महाराष्ट्र संघात


श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा झेंडा, मैसूर येथे स्पर्धेचे आयोजन, प्रशिक्षकांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन

अमरावती, 06 ऑगस्ट (हिं.स.)

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जिम्नॅस्टिक विभागाने पुन्हा एकदा राष्ट्रीयस्तरावर आपल्या गुणवत्तेची मोहोर उमटविली आहे. मंडळाच्या अमरावती जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रावर नियमित सराव करणाऱ्या १२ खेळाडूंची मैसूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद अॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. त्यामुळे अमरावतीच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मैसूर येथे प्रीयूथ, यूथ, ज्युनिअर आणि सिनिअर गटातील राष्ट्रीय अजिंक्यपद अॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक संघाच्या विविध गटांत हव्याप्र मंडळाच्या खेळाडूंची निवड झाली आहे. यूथ अॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक वुमेन्स ग्रुपमध्ये उमंग सोळंके, ओवी पांडे आणि दिव्या सावरकर, तर यूथ मेन्स ग्रुपमध्ये मोहीत पवार, यश माणिकपुरे व वेदांत हरणखेडे हे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. सिनिअर वुमेन्स ट्रायोमध्ये नव्या अरविंद पांडे, धनश्री जयप्रकाश रामावत आणि भाग्यश्री दादाराव कलाने यांची, तर सिनिअर वुमेन्स पेअरमध्ये स्नेहल कन्हेकर व इशिका साखरकर यांची निवड झाली आहे.

या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक संघाच्या ज्युनिअर अॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक संघाच्या प्रशिक्षकपदी एनआयएस प्रशिक्षक अक्षय अवघाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना मंडळाच्या जिम्नॅस्टिक विभागाचे प्रमुख प्रा. आशिष हटेकर, प्रशिक्षक अवघाते, सचिन कोठारे, हेमा राज वैद्य आणि डॉ. नीलेश जोशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मंडळाच्या सचिव, अमरावती जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक संघटनेच्या सचिव तसेच महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक संघटनेच्या उपाध्यक्ष डॉ. माधुरी चेंडके, अमरावती जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र खांडेकर, उपाध्यक्ष डॉ. विकास कोळेश्वर, कोषाध्यक्ष प्रा. राजेश पांडे, मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके आदींनी खेळाडूंचे कौतुक केले.

--------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande