
कोलंबो, 06 ऑगस्ट (हिं.स.)भारताविरुद्धच्या तीन दिवसीय सराव सामन्यासाठी श्रीलंका क्रिकेट इलेव्हन संघाची घोषणा करण्यात आली आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज सोनल दिनुशा संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. संघात कसोटीचा अनुभव असलेल्या सहा क्रिकेटपटूंचा समावेश आहे. यामध्ये निशान मदुष्का, लाहिरू कुमार, इसिथा विजेसुंदरा, विश्व फर्नांडो आणि रमेश मेंडिस यांचा समावेश आहे. भारत आणि श्रीलंका क्रिकेट इलेव्हन यांच्यातील सराव सामना ७ ऑगस्ट रोजी कोलंबो येथील नॉनडिस्क्रिप्ट क्रिकेट क्लबमध्ये सुरू होईल. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी आपल्या तयारीचा आढावा घेण्याची भारतीय संघासाठी ही पहिली आणि एकमेव संधी असेल.
तीन कसोटी सामने खेळलेल्या दिनुशाला श्रीलंका क्रिकेट इलेव्हन संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्याने डिसेंबर २०२५ मध्ये पदार्पण केले होते आणि गेल्या महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यातही खेळताना सहा बळी घेतले होते. त्यांच्या व्यतिरिक्त, निशान मदुष्काने १२, लाहिरू कुमाराने ३५, विश्व फर्नांडोने २८, इसिथा विजेसुंदरा १ आणि रमेश मेंडिसने १६ कसोटी सामने खेळले आहेत. पवन रत्नायके एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळला आहे.
भारतीय संघ ज्या खेळपट्टीवर आपला सराव सामना खेळणार आहे, ती गवताने आच्छादलेली ठेवण्यात आली आहे. यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत होईल. भारतीय संघाने दिलेल्या गवताच्या खेळपट्टीवर आक्षेप घेतला आहे. पण क्लबचे म्हणणे आहे की त्यांनी श्रीलंका क्रिकेटच्या निर्देशांनुसार असे केले आहे. भारतीय संघ सध्या कोलंबो येथील एनसीसी क्लबमध्ये सराव करत आहे. त्यांनी ५ ऑगस्टपासून सरावाला सुरुवात केली.
भारताविरुद्धच्या सराव सामन्यासाठी श्रीलंका क्रिकेट इलेव्हन संघ
सोनल दिनुषा (कर्णधार), निशान मदुष्का, रविंदू रशांत, पसिंदू सुरियाबंदरा, पवन रथनायके, अहान विक्रमसिंघे, अंजला बंडारा (यष्टीरक्षक), निपुण दानंजया, लाहिरू कुमारा, विश्वा फर्नांडो, असांका मनोज, इसिथा विजेसुंदर, रमेश मेंडिस, केसरा नुवंथा, दिलुम सुदिरा.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे