मोजतबा खामेनेईंशी संपर्क करणे कठीण, तरीही तेच इराणची मोठी ताकद - मसूद पेजेशकियन
तेहरान, 06 ऑगस्ट (हिं.स.)।इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी देशाचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. सध्याच्या परिस्थितीत मोजतबा खामेनेई यांच्याशी संपर्क साधणे अत्यंत कठीण झाले असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र,
मोजतबा खामेनेईंशी संपर्क करणे कठीण, तरीही तेच इराणची मोठी ताकद - मसूद पेजेशकियन


तेहरान, 06 ऑगस्ट (हिं.स.)।इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी देशाचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. सध्याच्या परिस्थितीत मोजतबा खामेनेई यांच्याशी संपर्क साधणे अत्यंत कठीण झाले असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, ते आजही देशासाठी मोठी ताकद असून इराणच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये आणि प्रत्युत्तरात्मक कारवायांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

इराणच्या सर्वोच्च सत्ताकेंद्रात मतभेद असल्याच्या तसेच राष्ट्राध्यक्ष आणि सर्वोच्च नेते यांच्यात तणाव निर्माण झाल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर पेजेशकियन यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी सांगितले, “सध्या त्यांच्याशी संपर्क साधणे खूप कठीण आहे. मात्र, त्यांची उपस्थिती आमच्यासाठी मोठी ताकद आहे आणि त्यातूनच आम्हाला पुढे जाण्याचे बळ मिळते.”

मोजतबा खामेनेई हे गेल्या काही काळापासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेतलेला नाही. वडील आणि माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर त्यांनी हे पद स्वीकारले. वृत्तानुसार, मोजतबा खामेनेई सध्या सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहत नसले तरी ते लेखी संदेशांच्या माध्यमातून सरकार आणि अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही ते सार्वजनिकरीत्या उपस्थित नव्हते.

मात्र, राष्ट्राध्यक्ष पेजेशकियन यांनी या सर्व अटकळी फेटाळून लावत मोजतबा खामेनेई यांच्यासोबत अनेक सकारात्मक बैठका झाल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, सर्वोच्च नेत्यांनी नेहमीच त्यांच्याशी सौहार्दपूर्ण वर्तन केले असून अत्यंत तर्कसंगत विचारसरणीचा परिचय दिला आहे. काही जण जाणूनबुजून त्यांची वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण वास्तव त्यापेक्षा वेगळे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, मोजतबा खामेनेई यांनी राष्ट्राध्यक्ष पेजेशकियन यांना अंतिम इशारा दिला असून महत्त्वाच्या निर्णयांमध्ये इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) चे कमांडर अहमद वाहिदी यांना पाठिंबा दिला आहे. इस्रायली चॅनलने सूत्रांच्या हवाल्याने असा दावा केला की, सर्वोच्च नेत्यांनी राष्ट्राध्यक्षांच्या राजकीय अधिकारांवर मोठ्या प्रमाणात मर्यादा आणल्या आहेत.

वृत्तानुसार, मतभेदांमुळे राष्ट्राध्यक्ष पेजेशकियन यांनी यापूर्वी अनेकदा राजीनाम्याची धमकी दिली होती. मे महिन्यात त्यांनी औपचारिकरित्या राजीनामा देण्याचाही प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयांमधून त्यांच्या सरकारला पूर्णपणे बाजूला ठेवण्यात येत असल्याचा त्यांचा आरोप होता.

याच अहवालात सर्वोच्च नेत्यांचा कल आता पूर्णपणे इराणच्या लष्करी नेतृत्वाकडे असल्याने राष्ट्राध्यक्षांची धोरणात्मक निर्णयांवरील पकड कमकुवत झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही आणि इराणी सरकारनेही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande