शेख हसीनांच्या डिजिटल पत्रकार परिषदेनंतर बांगलादेश संतप्त; भारताकडे व्यक्त केली नाराजी
ढाका, 06 ऑगस्ट (हिं.स.)।शेख हसीना यांच्या डिजिटल पत्रकार परिषदेनंतर बांगलादेशात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर नाराजी व्यक्त करत, या घटनेमुळे भारत-बांगलादेश संबंध सुधारण्याच्या
शेख हसीनांच्या डिजिटल पत्रकार परिषदेनंतर बांगलादेश संतप्त; भारताकडे व्यक्त केली नाराजी


ढाका, 06 ऑगस्ट (हिं.स.)।शेख हसीना यांच्या डिजिटल पत्रकार परिषदेनंतर बांगलादेशात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर नाराजी व्यक्त करत, या घटनेमुळे भारत-बांगलादेश संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांवर परिणाम होईल, असे म्हटले आहे. मात्र, भारताने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, हा माध्यमांशी संवाद एका खासगी वृत्तवाहिनीने आयोजित केला होता आणि त्यात भारत सरकारचा कोणताही सहभाग नव्हता.

बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिल्लीतून माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी माध्यमांशी केलेल्या व्हर्च्युअल संवादावर तीव्र आक्षेप घेतला. मंत्रालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे, “नरसंहाराच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या आणि फरार असलेल्या शेख हसीना यांना नवी दिल्लीतून माध्यमांशी थेट संवाद साधण्याची परवानगी देण्यात आली. या संवादादरम्यान त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बांगलादेश आणि तेथील जनतेविरोधात विषारी वक्तव्ये केली. या कार्यक्रमामुळे द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांवर विपरीत परिणाम होऊ शकतो, याची माहिती भारत सरकारला आधीच देण्यात आली होती. तरीही या सार्वजनिक कार्यक्रमाला परवानगी देण्यात आल्याबद्दल आम्हाला तीव्र खेद आहे.” त्याचबरोबर मंत्रालयाने स्पष्ट केले की, बांगलादेशला भारतासोबत रचनात्मक, परस्पर हिताचे आणि भविष्याभिमुख संबंध कायम ठेवायचे आहेत. हे संबंध सार्वभौम समानता, परस्पर आदर, एकमेकांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे आणि राष्ट्रीय सन्मान या तत्त्वांवर आधारित असावेत.

दरम्यान, शेख हसीना या 5 ऑगस्ट 2024 रोजी ढाका सोडून भारतात आल्या होत्या. त्यानंतर त्या भारतातच वास्तव्यास आहेत. व्हर्च्युअल संवादादरम्यान त्यांनी आपण निश्चितपणे बांगलादेशात परतणार असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, “मला माहिती आहे की, मला तुरुंगात टाकले जाऊ शकते किंवा माझी हत्या केली जाऊ शकते. तरीही मी माझ्या जनतेसोबत राहण्यासाठी मायदेशी परतणार आहे.” अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना यांनी भारताचे कौतुक करत, भारत हा नेहमीच बांगलादेशचा जवळचा मित्र राहिला आहे,” असे म्हटले. देशातील राजकीय परिस्थिती आणि जनतेसमोरील आव्हानांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले, “माझी परतफेड सत्तेसाठी नाही, तर बांगलादेशला पुन्हा विकास, धर्मनिरपेक्षता आणि समृद्धीच्या मार्गावर आणण्यासाठी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande