इमरान खान यांच्या समर्थनार्थ पाकिस्तानभर आंदोलन; 100 हून अधिक समर्थक ताब्यात
इस्लामाबाद, 06 ऑगस्ट (हिं.स.)। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना तुरुंगात जाऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने बुधवारी पाकिस्तानमध्ये इमरान खान यांच्या समर्थनार्थ आणि पाकिस्तान सरकारविरोधात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. पाकिस्ता
इमरान खान यांच्या समर्थनार्थ पाकिस्तानभर आंदोलन; 100 हून अधिक समर्थक ताब्यात


इस्लामाबाद, 06 ऑगस्ट (हिं.स.)। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना तुरुंगात जाऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने बुधवारी पाकिस्तानमध्ये इमरान खान यांच्या समर्थनार्थ आणि पाकिस्तान सरकारविरोधात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या समर्थकांनी देशभरात मोर्चे आणि निदर्शने केली. आंदोलनाची तीव्रता वाढताच रावळपिंडीमध्ये पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि इमरान खान यांच्या 100 हून अधिक समर्थकांना अटक केली.

इमरान खान यांच्या समर्थनार्थ सर्वात मोठी सभा पेशावर येथे झाली. खैबर पख्तूनख्वामध्ये सध्या पीटीआयची सत्ता असून, पक्षाने इमरान खान यांची तातडीने सुटका करण्याची आणि त्यांचे सर्व अधिकार पूर्ववत करण्याची मागणी केली.पंजाब प्रांतातील मियांवाली आणि रावळपिंडी येथेही पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार करत पीटीआयच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. लाहोरमध्येही इमरान खान यांच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली. येथील मॉल रोडवर खान यांच्या सुटकेची मागणी करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी पांगवले आणि अनेक जणांना ताब्यात घेतले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये रॅपिड रिस्पॉन्स फोर्स (आरआरएफ) आंदोलकांवर बळाचा वापर करत असल्याचे दिसून आले. आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या काही पत्रकारांनाही पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप असून, विविध माध्यम संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पीटीआय पंजाबचे महासचिव चौधरी बिलाल एजाज यांनी सांगितले की, लाहोरमध्ये अटक करण्यात आलेल्या 25 जणांमध्ये पक्षाचे पाच आमदारही आहेत.

चौधरी बिलाल एजाज यांनी वृत्तसंस्थाशी बोलताना सांगितले, “दडपशाही, छळ आणि हुकूमशाहीच्या वातावरणातही पंजाबमधील मोठ्या संख्येने पीटीआयचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आणि इम्रान खान यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. पीटीआयच्या माहितीनुसार, मियांवाली, रावळपिंडी आणि पंजाबमधील इतर भागांत किमान 50 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. तसेच पानो आकील येथे सहा, तर कंधकोट येथे 15 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.कराचीतील सदर टाउन परिसरातही पीटीआय समर्थकांच्या आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला आणि 10 हून अधिक आंदोलकांना अटक केली.

दरम्यान, खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री मुहम्मद सुहैल अफरीदी यांनी बुधवारी घोषणा केली की, इमरान खान यांना न्याय मिळाला नाही तर 27 सप्टेंबर रोजी पीटीआयचे समर्थक इस्लामाबादकडे मोठा मोर्चा काढतील. पेशावरमधील सभेला संबोधित करताना अफरीदी म्हणाले, “आमची पहिली मागणी म्हणजे इमरान खान आणि त्यांच्या पत्नीविरोधातील प्रकरणांची सुनावणी तातडीने करून गुणवत्तेच्या आधारे निर्णय द्यावा.”ते पुढे म्हणाले, “दुसरी मागणी म्हणजे इमरान खान यांना त्यांच्या वकिलांची टीम, डॉक्टर, नातेवाईक आणि पक्षाच्या नेत्यांची भेट पुन्हा घेण्याची परवानगी द्यावी.” अफरीदी यांनी दावा केला की, न्याय मिळाल्यास इमरान खान यांची अवघ्या 30 मिनिटांत सुटका होऊ शकते. अन्यथा, 27 सप्टेंबर रोजी पाकिस्तानभरातील समर्थक इस्लामाबादकडे विराट मोर्चा काढतील, असा इशाराही त्यांनी दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande