घरपट्टी-पाणीपट्टीबाबत फेक मेसेज पाठविणाऱ्यांवर सायबर पोलिसांत गुन्हा
Fake messages regarding house rent and water bills
घरपट्टी-पाणीपट्टीबाबत फेक मेसेज पाठविणाऱ्यांवर सायबर पोलिसांत गुन्हा


नाशिक, ६ ऑगस्ट (हिं.स.) : नाशिक महानगरपालिकेच्या घरपट्टी आणि पाणीपट्टीचे इंडेक्स क्रमांक बंद होणार असल्याचे सांगणारे बनावट संदेश पाठविणाऱ्यांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

शहरातील नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टीचे अनुक्रमांक अद्ययावत करण्यासाठी एका संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करणारे फेक मेसेज भ्रमणध्वनी क्रमांक ९३४११९८०९६ वरून पाठविले जात असल्याचे मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.मात्र, अशा प्रकारचे कोणतेही संदेश नाशिक महानगरपालिकेकडून पाठविण्यात आलेले नसल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा संदेशांकडे दुर्लक्ष करावे आणि कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी केले आहे.

दरम्यान, संबंधित बनावट क्रमांक सायबर पोलिसांच्या मदतीने बंद करण्यात आले असून, या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.घरपट्टी आणि पाणीपट्टीबाबत अफवा पसरविणाऱ्या किंवा नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. नागरिकांनी कोणतीही माहिती मिळवताना केवळ मनपाच्या अधिकृत माध्यमांवर विश्वास ठेवावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

------------------------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande