
नाशिक, 06 ऑगस्ट (हिं.स.)।नाशिक निर्वस्त्र फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत महिलेवर चार वर्षे लैंगिक अत्याचार करुन तिच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढून ७८ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सटाण्याच्या तरुणाविरुद्ध - गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातपूर परिसरातील श्रमिकनगर येथे फिर्यादी महिला घरात एकटी - असताना आरोपी निलेश अशोक पगार (वय ३०, रा. उत्राणे,नामपूर, ता. सटाणा) हा पिडीतेच्या घरी आला. त्याने पिडीतेला तुझे अश्लिल फोटो व व्हिडिओ माझ्याकडे असून, ते सोशल मिडियावर व्हायरल करेल, असे म्हणत पिडीतेला ब्लॅकमेल केले. त्यानंतर पिडीतेसोबत बळजबरीने तिच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध प्रस्थापित केले. दि. २० ऑगस्ट २०२० ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत आरोपी निलेश पगार याने फिर्यादीकडून बँक ऑफ महाराष्ट्रचे सही केलेले अकरा ब्लॅक चेक घेऊन फिर्यादीच्या बँक खात्यातून सुमारे १६ लाख रुपये परस्पर काढून घेतले. तसेच फिर्यादीला ब्लॅकमेल करून वारंवार ऑनलाईन ५२ लाख रुपये तसेच १० लाख रुपये असे एकूण ७८ लाख रुपये घेऊन पिडीतेची फसवणूक केली. तसेच पिडीतेच्या घरी येऊन तिच्या दोन मुलींसोबत गैरवर्तन करून पुन्हा पैशांची मागणी केली. मात्र पिडीतेने पैसे दिले नाही म्हणून तिच्याकडे लग्नामध्ये १० तोळे सोने आलेले होते, ते सोने दे नाही तर तुझ्या दोन्ही मुलींना मारून टाकेन व तुझी बदनामी करेन अशी धमकी देऊन आरोपी पगार याने पिडीतेने घरात ठेवलेले १० तोळे सोने बळजबरीने घेऊन घरातून निघून गेला.याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात निलेश पगारविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बुवा करीत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV